कठीण समय येता ज्योतिषी कामास येतो…

कठीण समय येता ज्योतिषी कामास येतो…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रडण्याचे किस्से आधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आता त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरेही हे किस्से रंगवून रंगवून सांगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बाहेर पडलेले सगळे आमदार हे नासके आंबे आहेत, असे अनेकदा जाहीर केल्यानंतर ठाकरे पिता पुन्हा पुन्हा त्या आंब्यांची चर्चा का करतायत हे कळायला मार्ग नाही. आदित्य ठाकरे आणि त्यांचे पप्पा जे काही सांगतायत ते किती खरं आणि किती खोटं हे फक्त मिलिंद नार्वेकर किंवा भूत-भविष्य जाणणारा ठाकरेंचा ज्योतिषीच सांगू शकेल.

महाराष्ट्रातील अनेक राजकारणी अलिकडे वारंवार फ्लॅशबॅकमध्ये जाताना दिसतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहाटेच्या शपथविधीबाबत बोलत असतात. अजितदादा पवार राष्ट्रवादीतील फुटीबाबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीबद्दल बोलतात आणि ठाकरे पिता-पुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीबाबत बोलत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या या घटनाक्रमात अजून बाहेर न आलेले बरेच काही शिल्लक आहे. सगळाच चोथा झालेला नाही. एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन कसे रडायचे ते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत जाहीर व्यासपीठावरून सांगितले. शिंदेंची मिमिक्रीही केली.

शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी याच वक्तव्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे. एक्सवर अपलोड केलेल्या पोस्टमध्ये, शिंदे साहेब शिवसेनेतून बाहेर पडू नयेत म्हणून कोण रडत होतं हे मिलिंद नार्वेकर यांना विचारा असा टोला हाणला आहे.

आता मिलिंद नार्वेकर यांनी हा तपशील उघड केला असता तर आदित्य ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध एवढं बोलायला धजावले असते का? अमिताभच्या दिवार सिनेमात एक डायलॉग आहे, लिफ्ट की दिवारो के कान नही होते… राजकारण्यांचे विश्वासू म्हणून वावरणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांच्यासारख्या लोकांनाही हा नियम लागू होतो. त्यांना कान नसतात. म्हणूनच त्यांना जवळ बाळगलं जाते.

२०२२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका हाच शिवसेनेतील फुटीचा केंद्रबिंदू होता. तिथून हे कथानक व्हाया सुरत गुवाहाटीला पोहोचले आणि गोवा मार्गे मुंबईत दाखल झाले.

विधान परिषदेचे मतदान झाले होते. मतमोजणी सुरू होती. पक्षाच्या वतीने मिलिंद नार्वेकर आत असल्यामुळे त्यांनी मोबाईल बाहेर ठेवला होता. मतदानानंतर एकनाथ शिंदे दहा आमदारांसह तडक साताऱ्यातील त्यांच्या गावी रवाना झाले. उद्धव ठाकरेंपर्यत ही बातमी पोहोचल्यावर ते हादरले. ठाकरे कितीही म्हणत असले की शिंदे फुटणार याची माहिती त्यांच्याकडे होती हे खरे नाही. आमदार फुटू नये म्हणून त्यांना हॉटेलात कोंडून ठेवता आलं असतं, हे ठाकरेंचे बोल म्हणजे निव्वळ पश्चात बुद्धी.

 

हे ही वाचा:

‘अश्विनचा घरी परतण्याचा निर्णय योग्यच!’

चंदीगडच्या भाजपा महापौरांचा पदाचा राजीनामा; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

काँग्रेसच्या प्रमोद कृष्णम यांचे आमंत्रण; मोदींनी केली कल्की मंदिराची पायाभरणी!

केंद्र सरकार आणखी चार पिकांवर किमान आधारभूत किंमत देण्यास तयार

एकनाथ शिंदे यांच्या मनातील खदखद कदाचित ठाकरेंना ठाऊक असेल, परंतु ते ४० आमदारांना फोडतील हे अशक्यप्राय वाटल्यामुळे ठाकरे निश्चिंत होते. भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, ते मला अटक करतील अशी विधाने त्यांनी ठाकरेंकडे जाऊन केलेली असतील, परंतु त्यामागे ठाकरेंना गाफील ठेवण्याचा डाव असावा. कारण याच दरम्यान शिंदे आणि फडणवीसांच्या गाठीभेटी होत होत्या. हुडी घालून फडणवीस शिंदेंना भेटायला जात होते.

शिंदे दहा आमदारांसह त्यांच्या गावी रवाना झाल्याचे कळल्यानंतर उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर यांना सतत फोन करत होते. नार्वेकर मतमोजणीत व्यस्त असल्यामुळे आणि त्यांनी फोन बाहेर ठेवला असल्यामुळे ते फोन उचलत नव्हते.
त्यामुळे ठाकरेंनी वायरलेसवर मेसेज पाठवला आणि नार्वेकर यांना आहे ते काम सोडून मला फोन करायला सांगा असा निरोप पाठवला. उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ होते. एकनाथ शिंदे एकटे नाहीत, या कल्पनेनेच त्यांना घाम फुटला. परंतु त्यांनी हालचाल करेपर्यंत शिंदे यांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या होत्या.

जेव्हा आमदारांचा आकडा चाळीसच्या वर आहे, असे लक्षात आले तेव्हा रश्मी ठाकरे यांनी पडद्या मागून हालचाली सुरू केल्या. त्यांनी शिंदे यांच्यासोबत असलेल्या सर्व शिवसेना आमदारांच्या सौभाग्यवतींना फोन करायला सुरूवात केली. तुम्ही आपल्या पतीला महाराष्ट्रात बोलावून घ्या, असे भावनिक आवाहन केले.
या सगळ्या पडद्या मागच्या हालचाली होत्या. नासके आंबे आम्ही फेकून दिले असे ठाकरे आज कितीही बोलत असले तरी तेच नासके आंबे परत फिरावे म्हणून त्यांनी ताकदीने प्रयत्न केले होते हे नाकारता येणार नाही असे सत्य आहे.

ठाकरे पिता-पुत्र जे आरोप करतायत, त्याचे त्यांना चोख प्रत्युतर द्यायचा प्रयत्न शिंदे यांच्यासोबत असलेल्या नेत्यांकडून केला जातोय. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दम दिला आहे. आदित्य ठाकरे कुठे कुठे जातात? त्यांचे ज्योतिषी कोण? ते कोणाला हात दाखवतात? हे आम्ही उघड करू अशा प्रकारचे विधान केले आहे. आदित्य ठाकरे यांचे नाईट लाईफ प्रेम, बॉलिवूड कनेक्शन सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते कुठे कुठे जात असतील याची अटकळ बांधणे सोपे आहे, परंतु शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाकारणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या पणतूला ज्योतिषांचे मात्र वावडे नाही ही नवी माहिती त्यांनी उघड केलेली आहे. सत्ता गेल्यानंतर ठाकरे कुटुंबाचे अच्छे दिन संपले.

काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार आणि शेंडी-जानव्याच्या हिंदुत्वाला असलेला विरोध गुंडाळून शनी शिंगणापूरला दर्शनासाठी गेले होते. कोकण दौऱ्याच्या वेळी त्यांनी एका मजारीसमोरही सजदा केला. चादर चढवली. आदित्य ठाकरे ज्योतिषाचे सल्ले घेतायत. ज्योतिषाच्या सल्ल्यामुळे मातोश्री-२ मध्ये कोणत्याही पक्ष कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला इतकेच काय उरल्यासुरल्या आमदार-खासदारांना प्रवेश निषिद्ध आहे. तिथे अजून नार्वेकरांनाही एण्ट्री मिळालेली नाही. इथे फक्त कुटुंबियांना प्रवेश आहे. तो आता रक्ताच्या नातेवाईकांना आहे की सग्यासोयऱ्यांना याबाबत मात्र माहिती उघड झालेली नाही.

मातोश्री-२ चे वास्तूशास्त्रानुसार काम करून घेण्यात आले आहे. इथे वरचे वर पूजा-हवन होत असते. काळ चांगला असतो तेव्हा लोक सोनाराकडे जातात आणि वाईट काळात डॉक्टर, वकील आणि ज्योतिषाकडे. रडारड आणि त्रागा कोणाचा सुरू आहे, हे महाराष्ट्राची जनता सकाळ संध्याकाळ पाहते आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version