27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरसंपादकीयआत्मविश्वास की टाइमपास?

आत्मविश्वास की टाइमपास?

अधिकाऱ्यांसोबत तुमचा व्यवहार कसा आहे, ही बाब सगळ्यात महत्वाची असते. चांगुलपणा सत्तेत असताना आणि नसतानाही उपयोगी पडतो.

Google News Follow

Related

ठाण्यात निवडणूक लढवून जिंकून दाखवणार असा दावा शिउबाठाचे आमदार, युवानेते आदित्य ठाकरे करतायत. सरकार पाडण्याची भाषा केली जाते आहे. आमचे सरकार येणार असा आत्मविश्वास व्यक्त केला जातोय. प्रश्न एवढाच आहे की हा आत्मविश्वास आहे, की टाईमपास?

ठाण्यात शिउबाठाच्या महिला कार्यकत्या रोशनी शिंदे यांना झालेल्या कथित मारहाणीचा निषेध करण्यासाठी पक्षाने शिवाजी मैदान ते पोलिस आयुक्त कार्यालय असा जनप्रक्षोभ मोर्चा काढला होता. आदित्य ठाकरे यांचे मोर्चेकऱ्यांसमोर भाषण झाले. थोडी दमबाजी शिंदे-फडणवीस सरकारला थोडी सरकारी अधिकाऱ्यांना. जे आयएएस, आयपीएस अधिकारी सरकारची मदत करतायत, त्यांना परिणाम भोगावे लागतील, आमचे सरकार आल्यावर त्यांना तुरुंगात टाकले जाईल, अशी भाषा आदित्य ठाकरे यांनी केली.

सनदी अधिकारी हे सरकार चालवण्यासाठी मदत करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा अविभाज्य भाग असतात. ते सरकारला मदत नाही करणार तर कोणाला करणार? हा प्रश्न भाषण ऐकणाऱ्या कुणालाही पडणे शक्य नाही. शिउबाठाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी आधीच जाहीर केले आहे की आमचे मेंदू गुडघ्यात असतात. परंतु किमान नेत्यांनी तरी भान बाळगले पाहिजे. आदित्य ठाकरे तर सरकारचे घटक होते. पर्यावरण मंत्री, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी ही भाषा करावी हे आश्चर्यकारक आहे. सरकार त्यांचे असताना अनेक सनदी अधिकारी फडणवीसांच्या संपर्कात होते. अधिकाऱ्यांसोबत तुमचा व्यवहार कसा आहे, ही बाब सगळ्यात महत्वाची असते. चांगुलपणा सत्तेत असताना आणि नसतानाही उपयोगी पडतो.

सत्तेवर असताना ज्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे दुकान मांडले, माज दाखवला, त्यांच्याशी सत्ता गेल्यावर अधिकारी कसे वागतात, याचा अनुभव उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. बदल्यांच्या या घाऊक व्यापाराचे पेन ड्राईव्ह महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांशी बोलत नसत. शिष्टाचार आणि परंपरांनुसार मुख्यमंत्र्यांनी आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देऊ नये असे संकेत आहेत. परंतु वदंता अशी आहे की उद्धव ठाकरे एपीआय सचिन वाझे याच्याशी बोलत असत. त्यामुळेच कदाचित ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजीत सिंह यांनी त्यांना भेटणे टाळले असावे. उद्धव ठाकरे यांना न भेटता ते निघून गेले. एका माजी मुख्यमंत्र्याचा यापेक्षा मोठा अपमान कोणता असू शकतो? कदाचित वाझेची वकिली केल्याची सजा त्यांना नीयतीने दिली असावी.

ज्या ठाण्यात ते रोशनी शिंदे यांना भेटायला सपत्नीक आले होते, त्याच ठाण्यात त्यांच्या सरकारच्या काळात पोलिसांनी मनसुख हिरणचा बळी घेतला होता. त्यात ठाकरे यांच्या लाडक्या आणि विश्वासू वाझेची भूमिका महत्वाची होती. ४० आमदार सोडून गेले, सनदी अधिकारी भेट नाकारतायत, तरीही ठाकरेंच्या आत्मविश्वासाची कमाल वाटते. आमचे सरकार येणार असे ठाकरे पिता-पुत्र ओरडून ओरडून सांगतायत. ठिकठिकाणी घेतल्या जाणाऱ्या सभा आणि पोसलेल्या पत्रकारांनी दिलेल्या बातम्यांच्या पलिकडे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिउबाठाकडे नेमका कोणता कार्यक्रम आहे?

ठाण्यात जी काही मूठभर गर्दी जमा झाली होती ती जमा करता करता ठाकरेंच्या तोंडाला फेस आला होता. ठाण्यातले कार्यकर्ते आले नाहीत म्हणून खासदार राजन विचारे यांना फैलावर घेण्यात आले. परंतु माणसंच उरलेली नाहीत त्याला ते तरी काय करणार? थोडी गर्दी जितेंद्र आव्हाडांनी मुंब्र्यातून जमवली. मीरा-भायंदरमधून माणसं आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे विलेपार्ले, अंधेरी, परळ, भांडूपमधून माणसं जमवावी लागली. ज्या गर्दीत ठाण्यातील मूठभर लोकही नव्हते, त्या ठाण्यातून लढणार अशी घोषणा ठाकरेंचे युवराज करतायत. एकनाथ शिंदे यांना पराभूत करण्याची भाषा करतायत. वरळीतून पडणार याबाबत युवराजांचा ठाम विश्वास झालेला दिसतोय.

आमचे सरकार येणार ही भाषा दर दुसऱ्या सभेत ठाकरे पिता-पुत्र करतायत. परंतु निवडणुका आल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी लोकांना मतदानाला बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड ताकद लागते. त्यासाठी मजबूत संघटन असावे लागते. संघटनेला मजबूत करण्यासाठी सतत कार्यक्रम द्यावे लागतात.

मुंबई भाजपाची एक छोटी आघाडी असलेल्या कोकण विकास आघाडीच्या तयारीचा आपण विचार करू. मुंबईत वास्तव्याला असलेल्या परंतु मूळ कोकणातील लोकांना जोडण्याचे काम ही आघाडी करते. या आघाडीचे मुंबईत ६ जिल्हाध्यक्ष आहेत, ३६ पैकी २९ विधानसभा अध्यक्ष आणि २२७ पैकी १६८ वॉर्ड अध्यक्ष घोषित आहेत. ५ हजार पन्ना प्रमुखांची नावे त्यांच्याकडे तयार आहेत. बुथ स्तरावर कार्यकर्त्याला जोडण्याचे काम सुरू आहे. सुहास आडीवरेकर हे कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत कोकणी माणसाला मोठ्या संख्येने मतदानाला उतरवण्याची जबाबदारी आम्ही अंगावर घेतली आहे, असे आडीवरेकर सांगतात.

हे ही वाचा:

ऐरोली-मुलुंड खाडी पुलाला जोडणार , नवी मुंबईतील पाम बीच रोडच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प मार्गी

कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे भाजपाचे वटवृक्षात रूपांतर

काँग्रेस नेते ए.के. अँटनींचे चिरंजीव अनिल अँटनीनी धरला भाजपाचा हात

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले जगातील नववे सर्वात व्यस्त विमानतळ

कोकण विकास आघाडीच्या महिन्यात दोन बैठका होतात. प्रत्येक बैठकीला किमान ८० पदाधिकारी हजर असतात. ही फक्त एका आघाडीची आकडेवारी आहे. भाजपाच्या अशा सतराशे साठ आघाड्या असतात. सतत कार्यकर्ते बैठकीच्या निमित्ताने भेटत असतात. चर्चा करत असतात. केंद्रीय नेत्यांचे दौरे सुरू असतात. केंद्रीय टीममधून देशभरातील कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिले जातात. मोदी-शहा यांच्या कार्यकाळात तर कार्यकर्त्यांना उसंतच दिली जात नाही. सतत कार्यक्रमांची जत्री लागलेली असते. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सतत धडपड सुरू असते.

दुसऱ्या बाजूला शिउबाठाची संपूर्ण मदार सहानुभूती या एकमेव घटकावर आहे. साप्ताहीक पाक्षिक बैठका होत नाहीत. विभाग प्रमुखाला वाटले तर तो पदाधिकाऱ्यांना बोलवून चर्चा करतो. कामात कोणतीही सुसुत्रता नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना निर्णय जरी ते घेत असले तरी त्यांच्या टीममध्ये असलेल्या दिग्गजांशी ते चर्चा करायचे. उद्धव ठाकरे घरगुती चर्चा करून निर्णय घेतात, असे त्यांचे पदाधिकारीही खासगीत सांगतात. त्यामुळे सरकार येणार हा सुका दम आहे, हे समजण्याइतके सनदी अधिकारी दुधखुळे नसतात. त्यांना वारा कोणत्या दिशेने वाहतोय हे अचूक ठाऊक असते. जयजीत सिंह माजी मुख्यमंत्री ठाकरेंना भेटले नाही, ही घटना अभूतपूर्व आहे. अनेक अर्थाने बोलकी आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे सरकार येणार असे वारंवार बोलल्यामुळे त्यांनाही बरे वाटते, कार्यकर्त्यांचाही वेळ बरा जातो.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा