वेगवेगळ्या नावाने महाराष्ट्रात यात्रा काढून पक्षाचे आणि पर्यायाने स्वत:चे भाग्य बदलण्याचा प्रयत्न ठाकरे पिता-पुत्र करतायत. शिवसंवाद यात्रा पार पडल्यानंतर आदित्य ठाकरे सध्या शिवगर्जना यात्रा काढत फिरतायत. गोरेगावात काल झालेल्या यात्रेत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे आमदार परतीच्या वाटेची चाचपणी करतायत, अशी पुडी सोडली. ही घोषणा सुरू असतानाच त्यांचे पितळ उघडे पडत होते. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आणि ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचा धुव्वा उडाला. सध्या ते शिवगर्जना यात्रेवर आहेत. गोरेगाव येथे झालेल्या सभेत, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यानंतर महाराष्ट्रात अंधार दाटलाय, असा दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरे सतत त्यांच्या वडीलांची स्तुती करत असतात, त्यामुळे आपण पण आपल्या वडिलांची स्तुती केली पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु उद्धव ठाकरे यांचे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते आणि आपले वडील उद्धव ठाकरे आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुढे नेत होते. परंतु दृष्ट लागली, पाठीत खंजीर खुपसला गेला. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या अंधार दाटला आहे, असे विधान आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राला कोणत्या दिशेने पुढे नेत होते, हे त्यांनी आधी स्पष्ट केले पाहिजे. मेट्रो कारशेड पासून बुलेट ट्रेनपर्यंत आणि रत्नागिरी रिफायनरीपासून वाढवण बंदरापर्यंत सगळ्या योजनांमध्ये खोडा घालणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राला बंगाल पॅटर्नच्या दिशेने नेत होते. ही दिशा सर्वनाशाची होती. पूर्ण नाश होण्यापूर्वी महाराष्ट्रातील सरकार गडगडले आणि महाराष्ट्र वाचला अशी जनतेची धारणा आहे.
आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दर सभेत नवनवी दूषणे देतात. गद्दार सोबत आणि त्यांनी सीएम म्हणजे करप्ट माणूस असा नवा शब्द शोधला आहे. असे शब्द शोधण्यासाठी, ५० खोके एकदम ओके… अशा घोषणा बनवण्यासाठी आदित्य यांनी बक्कळ पगारावर माणूस ठेवला असल्याचा दाट संशय आम्हाला येतो. वडील नवनव्या कोट्यांच्या शोधात असतात आणि चिरंजीव नव्या दूषणांच्या आणि घोषणांच्या शोधात.
एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्यापेक्षा अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आणि २५ वर्षांच्या महापालिकेच्या कार्यकाळात त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काय दिवे लावले हे लोकांना सांगितले असते, तर त्यांचेही प्रबोधन झाले असते. आदित्य ठाकरे यांना अविश्वसनीय आणि विनोदी दावे करून लोकांचे मनोरंजन करण्याची वेळ आली नसती. साहेब आम्हाला परत घेतील का? अशी विचारणा शिवसेनेचे आमदार करतायत. आम्हाला गद्दार नको विश्वासघाती म्हणा अशी विनंती करतायत, असा आदित्य यांचा दावा आहे.
हे ही वाचा:
सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई एकनाथ शिंदेसोबत
ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि या शिवसेनेमध्ये फरक आहे
शीतल म्हात्रे व्हिडीओ व्हायरल प्रकरण एसआयटीकडे देणार
भावाने केला बहिणीवर बलात्कार, पोलिसांनी मुसक्या आवळल्या
हे म्हणजे कोणताही कागद न दाखवता भ्रष्टाचारांचा गौप्यस्फोट करणाऱ्या संजय राऊतांसारखे आहे. सगळे आरोप करायचे, पण एकही पुरावा द्यायचा नाही. दिलेच तर पुराव्यांच्या नावाखाली काही तरी तकलादू बाड समोर ठेवायचे. अलिकडे मातोश्रीवर कोणाही हवशा-गवशाला शिवबंधन बांधून पक्षात घेणारे ठाकरे पिता-पुत्र शिवसेनेच्या आमदारांना ‘गद्दारांनो आहात तिथेच राहा, इथे येऊ नका’, असे सांगतील यावर कोण विश्वास ठेवेल? आदित्य ठाकरे यांचा दावा खरा असेल तर त्यांनी चार नावं सांगायला हवी होती. महाराष्ट्रात सत्ता राबवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना सोडून नाव आणि निशाणी गमावलेल्या पक्षाच्या वळचणीला जाऊन कपाळमोक्ष करण्याची इच्छा कोणाला झाली आहे, हे तरी महाराष्ट्राला कळले असते. नावे लपवून त्या आमदारांची इभ्रत वाचवण्या इतके आदित्य ठाकरे मनाने मोठे नक्कीच नाहीत.
आदित्य ठाकरे इथे शिवसेनेच्या आमदारांवर बोलत असताना कोकणात धुळवड पुन्हा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे पक्षातून बाजूला झाले, परंतु कोकणात फारशी पडझड झाली नाही. बहुतेक पदाधिकारी आजही ठाकरे यांच्या बाजूला आहेत. परंतु बाहेरून आलबेल दिसत असले तरी आत लाथाळ्या सुरू आहेत. कुडाळचे आमदार वैभव नाईक यांची सिंधूदुर्गच्या जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी ही कारवाई केली आहे.
नाईक हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सिंधूदुर्गात आहे. ते कधीही तिथे कोलांटी मारतील, अशा पैजा नाक्यानाक्यावर मारल्या जातायत. वैभव नाईक यांनी मात्र आपल्याला पक्षवाढीसाठी मोकळा वेळ मिळावा म्हणून स्वत:हून जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला झाल्याचे विधान केले आहे. हे विधान विनोदी आहे. एखाद्या हलवायाने दुकान सोडून, लाडू वळण्यासाठी आपण नाक्यावर गेलो, असे म्हणण्यासारखे आहे. पक्षवाढीसाठी नाईक जिल्हाप्रमुख पदावरून दूर झाले असतील तर त्या पदावर असताना ते काय भजी तळत होते? असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो.
जिल्हाप्रमुख पक्ष वाढीचे काम करत नाहीत मग नेमके करतात काय? कणकवली, कुडाळच्या एसटी स्टँडवर कांदा भजी तळण्याचे काम जिल्हाप्रमुख निश्चित करत नसणार? वैभव नाईक यांच्या जागेवर विनायक राऊत यांनी संजय पडते, संदेश पारकर आणि सतीश सावंत या तिघांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे वैभव नाईक हे एकटे तीन जणांचे काम करीत होते, हेही उघड झाले आहे.
वैभव नाईक हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर विरोधक आहेत, त्यामुळे ते भाजपा किंवा शिवसेनेत येण्याची शक्यता कमी आहे, असेही अनेकांना ठामपणे वाटते आहे. वैभव नाईक राहिले काय आणि बाहेर पडले काय, एक गोष्ट नक्की की कोकणात धुसफूस जोरात आहे. एका जिल्ह्यासाठी तीन जिल्हाप्रमुख नियुक्त करावे लागतायत. त्यांना एकेक सुभा बहाल करावा लागतो आहे. अस्वस्थ पदाधिकाऱ्यांना शांत करण्यासाठी, त्यांना पक्षात टीकवण्यासाठी कसरत करावी लागते आहे. कारण शिउबाठामध्ये सर्व काही आलबेल नाही. म्हणूनच शिवसेनेतील आमदार शिउबाठात यायला तडफडतायत, विनंत्या करतायत हा आदित्य ठाकरे यांचा दावा हास्यास्पद वाटतो. तुर्तास त्यांनी उरलासुरला पक्ष सांभाळला तरी भरून पावलो असे म्हणण्यासारखी पक्षाची स्थिती आहे.