दोन मिनिटांत सिद्ध होऊ शकते, आदित्य ठाकरेंचे निर्दोषत्त्व!

या बदनामीतून सुटका करून घेण्याचा एक राजमार्ग आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे.

दोन मिनिटांत सिद्ध होऊ शकते, आदित्य ठाकरेंचे निर्दोषत्त्व!

जब चुप रहेगी जुबान ए खंजर

लहू पुकारेगा आस्तीन का…

फार जुना शेर आहे. दिशा सालियन प्रकरणी अनेकजण आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवत होते. त्यात भाजपा नेते नारायण राणे, त्यांचे दोन्ही पुत्र यांचा समावेश होता. मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. विरोधकांचे गलिच्छ राजकारण म्हणून हे आरोप मोडीत काढण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या पक्षाने, त्यांच्या पाळीव मीडियाने नेहमीच केला. परंतु आता दिशाच्या वडीलांनी याप्रकरणी आदित्य ठाकरें यांच्यावर आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप केलेला आहे. या संदर्भात नाकारता येणार नाहीत, असे पुरावे बंद लिफाफ्यातून न्यायालयाला सादर केल्याचा दावा त्यांचे वकील करतायत. आदित्य ठाकरे यांच्यावर झालेले आरोप गंभीर असले तरी ते यातून दोन मिनिटात बाहेर येऊ शकतील. आपले निर्दोषत्व सिद्ध करू शकतील.

 

जून २०२० मध्ये अवघ्या सहा दिवसांच्या फरकाने झालेल्या दोन मृत्युंमुळे महाराष्ट्रासह देशभरात खळबळ माजली होती. ८ जून रोजी दिशा सालियन हिचा मालाड पश्चिमेतील एका उत्तुंग टॉवरच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. हा अपघाती मृत्यू होता, असे भासवण्याचा प्रयत्न झाला. १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची बातमी बाहेर आली. पाच वर्षे या दोन्ही प्रकरणात फक्त आरोप प्रत्यारोपांची राळ उडवण्यात येत आहे. निष्पन्न मात्र काहीच झालेले नाही.

 

बुधवारी १९ मार्च रोजी दिशाचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील नीलेश ओझा हे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक चॅनलवर आले. त्यांनी दिशा सालियन हिची हत्या झाली असून तिच्या आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूमध्ये संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली. याप्रकरणात सीआयडी चौकशीची मागणीही केली.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडलेले हे प्रकरण पाच वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत आहे. तसं पाहिले तर या प्रकरणाची चर्चा पूर्णपणे कधीही थंड झालेली नव्हती. जस्टीस फॉर दिशा एण्ड सुशांत ही चळवळ समाज माध्यमांमध्ये सुरू होतीच. परंतु आता सतीश सालियन यांच्या आरोपामुळे या मोहीमेला बळ मिळण्याची शक्यता आहे.

 

दिशा मृत्यूप्रकरणात काही मुद्दे निश्चितपणे बिनतोड आहेत. दिशा १४ मजल्यावरून खाली पडली तरी तिच्या मृतदेहावर कुठेच जखमांच्या खुणा नाहीत. ना तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग सापडले, ना तिचा मृतदेह उचलणाऱ्या तिच्या मित्रांच्या कपड्यांवर. सीसीटीव्ही फूटेजमध्ये गडबड करण्यात आली आहे. यातील काही मुद्दे सतीश सालियन यांनीही रिपब्लिकवर उपस्थित केले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यात आणखी काही गंभीर मुद्दे आहेत. याचिकेची सुनावणी राज्याबाहेर व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एसआयटीच्या तपासावरही प्रश्नचिन्ह लावण्यात आले आहे. २३ डिसेंबर २०२३ रोजी एसआयटीची स्थापना करण्यात आली. परंतु, वर्षभरात काहीही तपास झाला नाही. ज्यांच्यावर आरोप कऱण्यात आले आहेत, त्यांच्याविरुद्ध साधा गुन्हाही दाखल करण्यात आला नाही, असा दावा सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी केला आहे.

या प्रकरणात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. एसआयटी स्थापन करून एक वर्ष झाले, परंतु तपास पुढे सरकला नाही. एसआयटी अस्तित्वात असताना दिशा सालियन यांच्या वडिलांना त्यांच्याकडे जावेसे वाटले नाही. त्यांनी एका चॅनलकडे आपली भूमिका मांडली. एसआयटीत सामील असलेल्या चिमाजी आव्हाड या अधिकाऱ्याला हटवण्याची त्यांनी मागणी केली आहे. हे प्रकरण जेव्हा जोरात होते, तेव्हा नारायण राणे, त्यांचे पुत्र नितेश राणे हे याप्रकरणात आक्रमक होते. त्यांच्याविरोधात त्या काळात दिशा सालियन यांच्या परिवाराने बदनामीची केलेली तक्रार तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यामुळे केलेली आहे ही बाबही आता उघड झालेली आहे.

 

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना या प्रकरणाचा पुन्हा एकदा बोभाटा झालेला आहे. त्याचे पडसाद विधिमंडळात उमटणे स्वाभाविक आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यावर शिवसेनेच्या आमदारांनी दिशा सालियन प्रकरणात घोषणाबाजी केली. यात भाजपाचे आमदार नव्हते. मविआच्या सत्ताकाळात घडलेले हे प्रकरण चव्हाट्यावर आणण्याचे काम भाजपाच्या नेत्यांनी केले. आज तेच आरोप जेव्हा दिशाचे वडील करतायत, तेव्हा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर फक्त शिवसेनेचे लोक आंदोलन करतायत.

 

विरोधकांबाबत शेलक्या शब्दांत बोलायचे आणि वेळ येईल तेव्हा त्यांच्यासमोर लोटांगण घालायचे, असा प्रकार उद्धव ठाकरे करतायत. मविआच्या सत्तेसाठी त्यांनी काँग्रेससमोर लोटांगण घातले. राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री झाला तेव्हा भाजपासमोर लोटांगण घातले. त्या देवेंद्र फडणवीसांसमोर वाकले ज्यांचा उल्लेख कधी काळ यांनी फडतूस, टरबूज अशा शेलक्या शब्दात केला होता. दोन दिवसांपूर्वी तसेच शेलके बोल ते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलले. ‘मी मोदींसमोर लोटांगण घालत होतो, तेव्हा एकनाथ शिंदे डस्टबीनमध्ये बसून पाहात होते’, असे वक्तव्य ठाकरे यांनी केले. उद्या त्याच एकनाथ शिंदे यांच्यासमोर त्यांना लोटांगण घालण्याची वेळ येऊ शकते, याची झलक आज दिसली.

जेव्हा जेव्हा या प्रकरणाची चर्चा सुरू होते तेव्हा आदित्य ठाकरे अस्वस्थ होतात. जेव्हा राशिद खान पठाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती, तेव्हा आदित्य ठाकरेंनी कॅव्हीएट दाखल केले होते. काल जेव्हा रिपब्लिक चॅनलवर पुन्हा हा विषय चव्हाट्यावर आला तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली की माझी राजकीय बदनामी करण्यासाठी हे प्रकरण गेली पाच वर्षे उपस्थित करण्यात येत आहे.

 

एका तरुणीचा मृत्यू होतो. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली असा आरोप एका राजकीय नेत्यावर लागतो, त्यानंतर पोलिस त्याची साधी चौकशी करत नाहीत. जेव्हा तिचा मृत्यू होता, तेव्हा मविआचे सरकार सत्तेत होते, त्यामुळे चौकशी झाली नाही, राजकीय दबाव होता, असे गृहित धरू. परंतु ते सरकार कोसळल्यानंतर पहिले महायुती सरकार स्थापन झाले. विधानसभा निवडणुका झाल्या आता दुसरे महायुती सरकार स्थापन झाले आहे. पहिल्या महायुती सरकारने एसआयटीची घोषणा केली, सरकारमध्ये सामील असलेल्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. त्याच आरोपांमुळे एसआयटी स्थापन करण्यात आली. परंतु तरीही आजवर आदित्य ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले गेले नाही.

हे ही वाचा:

अमोल मिटकरी हे औरंगजेबाच्या कुटुंबातले!

चॅम्पियन्स रोहित सेना मालामाल!

रेनॉल्टची वाहनं एप्रिलपासून महागणार!

भरवेगात स्कुटी चालविणाऱ्याला जाब विचारला म्हणून एकाची हत्या

 

या बदनामीतून सुटका करून घेण्याचा एक राजमार्ग आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. ज्या दिवशी दिशावर बलात्कार आणि हत्या झाली, त्या दिवशी तिच्या घरी सुरू असलेल्या पार्टीत आदित्य ठाकरे, सुरज पंचोली, दिनो मोरीया हे सामील झाले. या पार्टी दरम्यान तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचे भासवण्यात आले. हे आरोप बिनबुडाचे आहेत, हे आदित्य ठाकरे सिद्ध करू शकतात. त्यांनी या दिवशी ते आणि ज्यांची या प्रकरणात नावे घेतली गेली आहेत ते बॉलिवूडचे मित्र कुठे होते, त्याचे मोबाईल लोकेशन जाहीर करण्याची विनंती पोलिसांना करावी. गुन्ह्याच्या तापासासाठी एखाद्या व्यक्तिचा कॉल डेटा रेकॉर्ड काढण्याचा पोलिसांना अधिकार असतो. संबंधित मोबाईल कंपनीकडे तशी रितसर विनंती केली जाते. या सीडीआरवर मोबाईलवर आलेल्या फोन कॉलची नोंद असतेच, शिवाय मोबाईल टॉवर लोकेशनवरून ते नेमके कुठे आहेत, याचाही अचूक अंदाज येऊ शकतो. मुंबई सारख्या शहरात दर पाचशे मीटरसाठी मोबाईल टॉवर आहेत. त्यामुळे कोण कुठे आहे, हे सहज कळू शकते. ज्या दिवशी दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी आपण आजोबांसोबत हॉस्पिटलमध्ये होतो, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे, त्याचे दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version