लोकसभा निवडणुकीत एकगठ्ठा मुस्लीम मतांमुळे मविआला दणदणीत विजय मिळाला. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होईल या आशेवर मविआचे नेते आहेत. ही मते मविआच्याच पारड्यात पडतील अशी शक्यता असूनही मविआचे नेते भारी टेंशनमध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीत कमावलेलं यश विधानसभा निवडणुकीत हाती लागण्याबाबत ही मंडळी साशंक झालेली आहेत. असे काही तरी घडते आहे, ज्याचा तोडगा शरद पवार, नाना पटोले इतकंच काय राहुल गांधी यांच्याकडेही नाही. या तमाम नेत्यांच्या काही विधानातून ही अस्वस्थता साफ झळकते आहे.
लोकसभा निवडणुकीत देशभरात मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाले. महाराष्ट्रात मविआला मिळालेल्या यशात या मतांचे मोठे योगदान होते. विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतांची कृपादृष्टी व्हावी यासाठी मविआच्या नेत्यांनी मुस्लीमांसमोर लोटांगण घातलेले आहे. ऑल इंडीया उलेमा बोर्डच्या मौलवींनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. गेल्या दहा वर्षात मुस्लीम युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या, रा.स्व.संघावर बंदी, वक्फ बोर्डाला हजार कोटी, अशा काही मागण्या काँग्रेस समोर ठेवण्यात आल्या. सत्तेवर आल्यावर काँग्रेस या मागण्यांबाबत गंभीरपणे विचार करेल असे आश्वासन देऊन पटोले मोकळे झाले. थोडक्यात सांगायचे तर मुस्लीम मतांसाठी हिंदूंना विकण्याची पूर्ण तयारी मविआने केलेली आहे.
शरद पवार यांनी तर मौलाना सज्जाद नोमानी यांना कडेवर घेतले आहे. अहिल्यानगरचे पुन्हा अहमदनगर करण्यापासून अनेक मागण्यांवर आम्ही सकारात्मक असल्याचे आश्वासन त्यांनी मुस्लीम नेत्यांना दिलेले आहे. राहुल गांधी तर देशातील सगळ्यांची संपत्ती ताब्यात घेऊन त्याचे समान वाटप करण्याचे आश्वासन देऊन मोकळेही झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात पाकिस्तानमधून फवाद चौधरी यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेसला पाठींबा दिला होता. हाच प्रकार जम्मू काश्मीर निवडणुकीच्या काळात घडला. पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ याने काँग्रेसवर पुन्ह प्रेम व्यक्त केले. तिहार तुरुंगात असलेला दहशतवादी यासिन मलिक याची पत्नी मुशाल हुसेन मलिक हिने तर राहुल गांधी यांना पत्र लिहून यासिनच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची प्रेमळ गळ घातलेली आहे. एका भारतद्रोही दहशतवाद्याच्या पत्नीला राहुल गांधी यांच्यावर इतका विश्वास वाटावा, महाराष्ट्रातील हिंदूद्रोही कट्टरवाद्यांना शरद पवार आणि पटोलेंचा आधार वाटावा यात मविआच्या नेत्यांना काही वावगे वाटते नाही. उलट या गोतावळ्यात मविआचे नेतेही मिरवत असतात कारण त्यातून मतं मिळण्याचा मार्ग मोकळा होता.
आता मुस्लीम मतांसाठी इतकी भक्कम रणनीती असताना मविआचे नेते धास्तावलेत का? कारण मविआचे मुस्लीम प्रेम हिंदूंच्या मुळावर येणार ही बाब मतदारांना पटवण्यात हिंदुत्वावाद्यांना यश येते आहे. बटेंगे तो कटेंगे हे योगी आदीत्यनाथ यांचे विधान हिंदूंच्या कानातून आधी हृदयात आणि नंतर मेंदूमध्ये पक्के बसले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातील सभेत एक रहेंगे तो सेफ रहेंगेचा इशारा दिला. त्याच धुळ्यातून जिथे एकट्या मालेगावातील मुस्लीम मतांच्या जीवावर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी अन्य पाच मतदार संघातील हिंदू मतांच्या आघाडीवर पाणी फेरले. शरद पवार हिंदूंना जाती जातीत विभागण्याचा प्रयत्न करतायत. एका बाजूला हिंदूंना जाती जातीत तोडायचे आणि त्यात मुस्लीमांचे एकगठ्ठा मतदान जोडायचे हा सत्तेवर येण्याचा राजमार्ग पवारांनी लोकसभा निवडणुकीत वापरला. या रणनीतीची महायुतीचे नेते व्यवस्थित चिरफाड करतायत, हिंदूंना जागे करतायत त्यामुळे शरद पवार आणि त्यांचा कंपू अस्वस्थ झालाय.
हे ही वाचा..
काँग्रेसने घोटाळे करण्यात स्वतःचेचं रेकॉर्ड्स मोडलेत
रामगिरी महाराज, नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न, मुस्लीम आरक्षण आणि बरच काही…
‘एक हैं तो सुरक्षित हैं’ बरोबर आता आरएसएसची ‘सजग रहो’ मोहीम
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘संकल्प पत्र’ उद्या जाहीर होणार
बटेंगे तो कटेंगे… ही घोषणा हिंदूंना मस्तकात घुसली आहे याची जाणीव झाल्यामुळे काँग्रेस इको सिस्टीम कामाला लागली आहे. सध्या फेसबुक पुरते उरलेले विश्वंभर चौधरी ‘न बटेंगे… न कटेंगे’, असे केविलवाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत. ‘जुडेंगे तो जितेंगे’ हे योगींच्या घोषणेवर काँग्रेसचे उत्तर आहे. शरद पवारांनी तर महायुतीवर धर्माच्या नावावर माणसा माणसांत विद्वेष निर्माण करू नका असा ज्ञान दिलेले आहे. भाजपाकडे अशी काही माणसं आहे, जी फक्त विद्वेष निर्माण करतात, या शब्दात त्यांनी योगी आदीत्यनाथांवर निशाणा साधला आहे. हा बटेंगे तो कटेंगे…चा प्रभाव आहे. ही घोषणा गेम चेंजर ठरण्याची खात्री मविआच्या नेत्यांना झालेली आहे. मुस्लीमांना असुरक्षित असल्याची चिथावणी देऊन त्यांना आपल्या पारड्यात एकगठ्ठा मतदान करण्यास भाग पाडायचे हे चांगले आणि या रणनीतीच्या विरोधात हिंदू एकवटले तर ते वाईट, अशी भूमिका पवार, पटोले आणि कंपनीने घेतली आहे. हिंदू जनमानस आता सजग झाल्याची जाणीव झाल्यामुळे ही मंडळी टेंशनमध्ये आली आहेत.
पवारांचे पिल्लू मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची झेप, आता उरलो तुतारी पुरता… इतपतच असल्यामुळे जाती जातीत हिंदू विभागला जाण्याची शक्यताही क्षीण होते आहे, त्यामुळे पवारांना पोटशुळ उठला आहे. त्यातून त्यांनी योगी आदीत्यनाथांवर टीका केलेली आहे. राहुल गांधी योगींच्या घोषणेवर उतारा शोधतायत. एकगठ्ठा मुस्लीम मतांसाठी मविआचे नेते हिंदू हिताचा सौदा करतायत ही बाब चव्हाट्यावर आल्यामुळे पवारांचा पार हिरमोड झालेला दिसतो.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)