विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. ठिकठीकाणी घोषित झालेल्या उमेदवारांनी काही ठिकाणी अपक्ष अर्ज सुद्धा दाखल केलेले आहेत. एका बाजूला ही प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या आजही जाहीर होताना आपल्याला दिसतायेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातल्या एका जागेवर उमेदवार देण्यात आला. त्याच जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही होता. हा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांना विचारला तेव्हा संजय राऊत यांनी काँग्रेसच्या उमेदवार यादीमध्ये टायपिंग मिस्टेक झाली असेल असं सांगितलं. एवढेच नाही तर आमच्याही उमेदवार यादीमध्ये टायपिंग मिस्टेक होऊ शकते असंही त्यांनी बोलताना सांगितलं. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जागावाटपावरून फारसं सख्य नाही उलट कुठेतरी कुरघोडीचं राजकारण होताना आपल्याला दिसून येईल.
जेव्हा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागल्या तेव्हापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपावरून सुरुवातीपासून घोळ हा सुरूच आहे. एकमेकांविरोधातली वक्तव्य जाहीरपणाने माध्यमांमध्ये करणं असेल किंवा परस्पर उमेदवारी जाहीर करण्याचा प्रकार असेल यावरून टीका टिपण्या झाल्याचं आपण अनेक वेळा बघितलेले आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये मागच्या वेळेला तिथे दिवंगत शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांचे नातू यांना उमेदवारी देण्याचा शब्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेला होता. त्यामुळे त्यांनी तिथे तयारी पण सुरू केलेली होती. मात्र सांगोला विधानसभा ही शिवसेनेची जागा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथले स्थानिक नेते दीपक साळुंखे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांनी सूचकपणे दीपकआबा साळुंखे यांची उमेदवारी जाहीर केलेली होती. प्रत्यक्षात उमेदवारीची घोषणा त्यांनी केली नसली तरी उमेदवारीचे संकेत हे त्या दिवशी त्यांनी दिलेले होते. असाच प्रकार त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत केलेला होता. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांची त्याच प्रवेशावेळी उमेदवारीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य घडलं आणि काँग्रेस पक्षाकडून तिथं तयारी करत असणारे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि ते अपक्ष म्हणून निवडून आले.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियात दोन हिंदू मंदिरांची तोडफोड
माहीममध्ये रंगणार तिरंगी लढत; अमित ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज
…म्हणे फडणवीस हे दुश्मन नव्हे विरोधक!
सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबेल तेव्हाच बंगालमध्ये शांतता नांदेल!
आज हाच प्रकार विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात घडलेला आपल्याला दिसून येतो. निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यापूर्वी सामान्यपणे ती यादी अनेक लोक तपासत असतात. टायपिंग मिस्टेक वगैरे अशा गोष्टी होणं हे शक्य नाही. त्याच्यामुळे काँग्रेसनं तिथं उमेदवार जो दिलेला आहे तो अत्यंत जाणीवेतून दिलेला आहे. त्या जागेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष हा आग्रही असला तरी ती जागा ही दिल्लीतून नक्की झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलेला आहे. बर काँग्रेसच्या यादीमध्ये टायपिंग मिस्टेक आहे हे काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करणे अपेक्षित आहे. ते संजय राऊत यांनी म्हणणं म्हणजे एक प्रकारे काँग्रेसला लक्ष्य करण्याचाच प्रकार आहे. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर अशी टायपिंग मिस्टेक आमच्याकडून सुद्धा होऊ शकते आस त्यांनी सांगितलं याचा अर्थ असा आहे की आम्ही सुद्धा अशा पद्धतीने उमेदवार देऊ शकतो. अशा या बेबनावामुळे महाविकास आघाडीत शेवटच्या क्षणी सांगली पॅटर्न होऊ शकतो. टायपिंग मिस्टेक वरून एक गोष्ट लक्षात आली. माग एकदा दिवंगत काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाकडून टायपिंग मिस्टेक झाल्याचा उल्लेख केलेला होता. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात काहीतरी चूक झालेली होती आणि तो विषय पत्रकारांनी पत्रकार परिषदेमध्ये काढल्यानंतर विलासराव देशमुख यांनी तो टायपिंग मिस्टेकचा प्रकार असल्याचे सांगितलं. तेव्हापासून खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा असे काही प्रसंग घडतात तेव्हा टायपिंग मिस्टेक हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रूढ झाला. त्याचा सहारा आज खासदार संजय राऊत यांनी घेतलेला आहे. भले महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन आमच्यात काही मतभेद नाहीत, जागावाटप निश्चित झाले आहे असं सांगत असले तरी असे टायपिंग मिस्टेकच्या प्रकारातून त्यांच्यातील मतभेदाना वाट मोकळी होत आहे. खरं तर आताचा काळ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काळ आहे. खरी गंमत ही अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी येणार आहे. त्याच दिवशी कळणार आहे की कोणी पाडापाडीचे राजकारण केले आहे ते. जो सांगली पॅटर्न म्हणून सांगली लोकसभा निवडणुकीकडे बघितलं गेलं आता तिथेच काँग्रेसच्या उमेदवारीवरून राजकारण सुरु झाले आहे. तिथे काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची जास्त शक्यता आहे. लवकरच त्याबद्दलचा निर्णय समजू शकतो. त्यामुळं लोकसभा निवडणुकीची स्थिती आता राहिलेली नाही हे सुद्धा यावरून अधोरेखित होतं. महाविकास आघाडीत असे सांगली पॅटर्न जर वेगवेगळ्या मतदारसंघात तयार झाले तर आश्यर्य वाटायला नको.