छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास प्रसिध्द करावा!

उदयन राजेंनी भेट घेऊन केल्या विविध मागण्या

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास प्रसिध्द करावा!

गेला काही काळ देशात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, औरंगजेब यावरून रणकंदन माजलेले पाहायला मिळाले. त्यातून इतिहासाचा पट उलगडण्याचा प्रयत्न झाला. अनेक वादविवाद झाले. न्यायालयात दाद मागण्यात आली. गुन्हे दाखल झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन इतिहासासंदर्भात ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

उदयनराजे भोसले यांनी याबाबत एक्सवर पोस्ट लिहून आपण केलेल्या मागण्या सांगितल्या आहेत. त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली. राज्यकारभारात रयतेच्या सहभागाव्दारे लोकशाहीचा पाया रचला. लोककल्याणासाठी अहोरात्र आयुष्य वेचले. परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छपध्दतीने त्यांचा तसेच छत्रपती संभाजीमहाराज आणि राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांचा अवमान होईल असे भाष्य, टिपणी किंवा कृती करतात. यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळुन,समाजामध्ये दुफळी पसरते.अश्या प्रवृत्तींची जीभ छाटण्याची किंवा चौरंग करण्याची धमक आमच्यासह शिवप्रेमींमध्ये निश्चित आहे परंतु आम्ही संयम राखुन आहोत.

१० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा द्या!

केंद्र व राज्यशासनाने अश्या प्रवृत्तींना धडकी भरवणारा मकोका/ टाडा सारखा अजामिनपात्र आणि १० वर्षे सश्रम कारावासाची व जबर दंडाची शिक्षा असलेला विशेष कायदा पारित करावा अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव घेण्याचा आपल्याला कोणालाच अधिकार राहणार नाही अश्या रोखठोक शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत, केंद्रीय मंत्री ना.अमित शहा यांना समक्ष भेटुन याबाबतचे निवेदन दिले. देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा यांची आज दिल्ली येथे भेट घेवून, विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली.

हे ही वाचा:

नागपूर हिंसाचार -बांगलादेश कनेक्शन? मुंबईत एका बांगलादेशीला अटक

इजिप्तच्या लाल समुद्रात ४५ पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बुडाली, ६ जणांचा मृत्यू!

सोने तस्करी प्रकरण: रान्या रावचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला

भाजपा आमदार योगेश सागर यांच्याकडून ‘सामूहिक विवाह सोहळ्या’चे आयोजन!

यावेळी झालेल्या चर्चेत तसेच दिलेल्या निवेदनात नमुद केले की, राज्यशासनाने तज्ज्ञांशी विचारविमर्श करुन, ऐतिहासिक दस्तावेजांचा योग्य अर्थ लावून, यापूर्वीच शिवछत्रपतींसह मराठा साम्राज्याचा शासनमान्य साधार इतिहास प्रसिध्द करणे गरजेचे होते. आज विकृत प्रवृत्ती असलेली व्यक्ती, त्याला जसे समजले, वाटते आहे अश्या पध्दतीने इतिहासातील प्रसंगाचे वर्णन करुन अकारण विवाद निर्माण करतो. अश्या प्रवृत्तींमुळे समाजामध्ये दुही पसरतेच परंतु राज्यातील देशातील कायदा आणि सुव्यवस्था देखिल बिघडते. शेजारी राहणा-यांची मने कुलूषित होतात आणि त्याचे दिर्घ परिणाम समाजाला भोगावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. आमच्या संयमाचा कडेलोट होण्यापूर्वीच राज्य व केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिध्द करावा त्याचबरोबरीने अश्या प्रवृत्तींचेबाबतीत कायदेशीर कारवाई करता येणारा तसेच , किमान १० वर्षाची शिक्षा असणारा अजामिनपात्र विशेष कायदा पारित करावा. ऐतिहासिक घटनांचे चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेबसीरिज, डॉक्युमेंटरीज यांचे चित्रिकरणापूर्वी सेन्सॉर बोर्डाला सहाय्यभुत असलेली, इतिहासकार, संशोधक आणि इतिहासतज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी, कमिटीच्या शिफारशी विचारात घेवून सेन्सॉरशिप देण्यात यावी जेणेकरुन सभाव्य विरोधाभास टाळण्याचे आणि समाजस्वास्थ अबाधित राखणे शक्य होईल अशी सूचना देखिल यावेळी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तुत्वाचा अतुलनीय वारसा आपल्याला लाभला आहे. सपूर्ण जगासाठी प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची प्रचिती देणारे राष्ट्रीय स्मारक नवी दिल्ली येथे उभारणे गरजेचे आहे. या स्मारकामध्ये राष्ट्रीय आणि आतर्राष्ट्रीय स्तरावरुन, संशोधन आणि संकलित केलेले छत्रपतींविषयी अप्रकाशित दस्तावेज, चित्रे, शस्त्रांस्त्रे, ऐतिहासिक नोंदी, चित्रे, कलाकृती, युध्दनिती, इत्यादींचा समावेश असावा. तसेच छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वडील, स्वराज्याचे संकल्पक, शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटक राज्यात आहे.आर्किलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने हे क्षेत्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहिर केलेले आहे.

शहाजीराजांची समाधी उभारा!

स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून सत्यात उतरवण्यासाठी अखंड परिश्रम घेणा-या आणि युध्दामध्ये गनिमी काव्याचा युध्दमंत्र देणा-या शहाजीराजेंची समाधी दुर्लक्षित आणि अविकसित राहाणे हे न पटणारे आहे. २३ जानेवारी १६६४ रोजी अंतिम श्वास घेतलेल्या शहाजीराजेंच्या असामान्य व्यक्तीमत्वाची समाधि व आजुबाजुचा परिसराचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने भरीव निधी उपलब्ध करुन देणे हे केंद्राचे कर्तव्य आहे. मुंबई येथील अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभारणेची पायाभरणी झाली आहे. तथापि अनेक वर्षे या स्मारकाला गती मिळालेली नाही. याबाबत शिवप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये नाराजी बरोबरच असंतोष जाणवत आहे. सदरचे स्मारक महाराष्ट्राची असिमता आहे. जगातील सर्वांत मोठे आणि सर्वांगसुंदर असे स्मारक उभारण्याचा आपला मनोदय आहे. हा आपला मनोदय कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे असेही सांगीतले. यावेळी समवेत,  काका धुमाळ, ॲड . विनित पाटील,  कुलदिप क्षिरसागर, करण यादव उपस्थित होते.

Exit mobile version