Chaitra Navratri : आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात "गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती" उभारण्यात आली आहे. शिवसेनेच्या या नवरात्र उत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून गुढीपाडवा रविवार दि. ३० मार्च ते रामनवमी दि ६ एप्रिल पर्यंत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे.

Chaitra Navratri : आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती

चैत्र महिना सुरु झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्रोत्सवाचे. यंदाचे ३० वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील मासुंदा तलाव जवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्यापासून चैत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरु होणार आहे.

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात “गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती” उभारण्यात आली आहे. शिवसेनेच्या या नवरात्र उत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून गुढीपाडवा रविवार दि. ३० मार्च ते रामनवमी दि ६ एप्रिल पर्यंत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे.

भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे. या देवीचा आगमन सोहळा रविवार दि. ३० मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता कळवा येथून वाजत गाजत होणार आहे. यावेळी ३०० जणांचे लेझीम पथक जय्यत तयारीत आहे.

तसेच संपूर्ण ठाणे जिल्हयातून वारकरी सांप्रदायाचे वारकरी, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे व पुरुषांचे लेझीमपथक, घोडेस्वार, मावळे आगमनासाठी सज्ज झाले आहेत.

नवरात्र उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात सुप्रसिध्द प्रधानाचार्य व यज्ञाचार्य वे.शा.सं.मुकुंदशास्ञी मुळे (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. या नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची देवी भक्तांना मेजवानी अनुभवता येणार आहे. तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती

चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवित आहेत. या मंदिराची उंची ७० फूट असणार आहे. देवीचा सभा मंडप २४×२४ फुटाचा असणार आहे. तसेच सजावटीचा एक भाग म्हणून १० X ४ श्री रामांची प्रतिकृती, १० X ४ श्री हनुमानाची प्रतिकृती तसेच २५X१५ आकारमानाचे श्री राम मंदिराची प्रतिकृती फुटपाथलगत श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान समोर, मासुंदा तलाव कॉर्नर, जांभळी नाका, ठाणे येथे तात्पुरत्या स्वरूपात उभे करण्यात येणार आहेत.

९ दिवसांच्या कार्यक्रमाची रुपरेषा

रविवार दि. ३० मार्च २०२५ रोजी कोळीगीते – संतोष चौधरी प्रस्तुत “दादूस आला रे” हा कार्यक्रम तसेच कोळी समाजातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे.

सोमवार दि. ३१ मार्च २०२५ रोजी ह. भ. प. श्री. निवृत्ती महाराज इंदूरीकर, यांचे वारकरी किर्तन. तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे.

मंगळवार दि. ०१ एप्रिल २०२५ रोजी भोजपुरी लोक संगीत नाईट सुप्रसिद्ध लोकगायक शिवम पांडेय, लोकगायिका ममता उपाध्याय यांचा कार्यक्रम तसेच उत्तर भारतीय समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

बुधवार दि. ०२ एप्रिल २०२५ रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ठाणे लोकसभा क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना `नवदूर्गा’ पुरस्काराने तर कर्तृत्ववान पुरुषांना `नवरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गुरुवार दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी निलेश ठक्कर प्रस्तुत – गुजराथी दांडिया रास गरबा व गुजराथी, राजस्थानी, मारवाडी, कच्ची जैन, समाजातील मान्यवरांचा सन्मान तसेच वैष्णवाचार्य पु. पा. गो. १०८ श्री. द्रुमिलकुमारजी महोदयश्री यांची उपस्थिती लाभणार आहे.

शुक्रवार दि. ०४ एप्रिल २०२५ रोजी भोंडला, मराठमोळा दांडिया, किरण वेहेले प्रस्तुत मराठी रास रंग कार्यक्रम.

शनिवार दि. ०५ एप्रिल २०२५ रोजी किरण वेहेले प्रस्तुत हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम, कलर्स ऑफ बॉलीवूड.

रविवार दि. ०६ एप्रिल २०२५ रोजी किरण वेहेले प्रस्तुत जल्लोष महाराष्ट्राचा, मराठमोळ्या गाण्यांचा नृत्यमय नजराणा कार्यक्रम.

सोमवार दि. ०७ एप्रिल २०२५ रोजी सायं. ५:०० वाजता देवीची विसर्जन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Exit mobile version