आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या पत्नी ऍना लेझनेवा यांनी रविवारी तिरुमला मंदिरात डोक्यावरील संपूर्ण केस दान केले. मंदिरात मुंडन करतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि ऍना लेझनेवा यांचा मुलगा सिंगापूरमध्ये आगीच्या घटनेत सापडला होता. आगीच्या विळख्यात अडकल्याने तो जखमीही झाला होता. यानंतर पवन कल्याण यांनी सिंगापूरला धाव घेत मुलाची भेट घेतली होती. शिवाय त्याला भारतातही आणले होते. दरम्यान, पवन कल्याण यांच्या पत्नी ऍना लेझनेवा यांनी तिरुमला मंदिरात मुलाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत मुलाच्या सुखरूप परतण्यावर संपूर्ण केस दान करण्याचा नवस केला होता. यानंतर त्यांचा मुलगा सुखरूप भारतात परतताच त्यांनी आपला नवस पूर्ण केला आहे. ऍना लेझनेवा यांनी तिरुमला तिरुपती मंदिरात जाऊन आपले केस दान केले . ऍना लेझनेवा यांनी रविवारी मंदिराला भेट दिली आणि त्यानंतर त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, “परंपरेनुसार ऍना लेझनेवा यांनी पद्मावती कल्याण कट्ट्यावर आपले केस अर्पण केले आणि धार्मिक विधींमध्ये भाग घेतला.” प्रेस रिलीज आणि तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) नुसार, रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन ऍना लेझनेवा यांनी गायत्री सदन येथे मंदिर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका घोषणापत्रावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये मंदिराला भेट देण्यापूर्वी आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यापूर्वी परमेश्वरावर त्यांचा विश्वास असल्याचे सांगितले. नंतर, त्यांनी आशीर्वाद घेण्यासाठी मंदिराला भेट दिली.
हे ही वाचा :
…तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा पर्याय
४८ तासांच्या आत वक्फ कायदा रद्द करू!
‘हिंदूंची कत्तल होतेय आणि खासदार युसूफ पठाण चहाचा आनंद घेतोय!’
८५० बैल आणि ३५० बुलफायटर्सचा पराक्रम बघा
माहितीनुसार, पवन कल्याण यांचा मुलगा मार्कच्या हाताला आणि फुफ्फुसांना दुखापत झाली आहे. तो सिंगापूरमधील स्थानिक रुग्णालयात उपचार घेत होता. घटनेच्या काही तासांनंतर, पवन कल्याण यांनी माध्यमांना संबोधित केले आणि सांगितले की धुरामुळे फुफ्फुसांना झालेले नुकसान निश्चित करण्यासाठी त्यांच्या मुलाची ब्रॉन्कोस्कोपी करावी लागली. १३ एप्रिल रोजी मुलाला घेऊन हे कुटुंब हैदराबादला परतले. नंतर, पवन कल्याण यांनी त्यांच्या मुलाच्या रुग्णालयात दाखल होताना त्यांच्या पक्षाच्या सदस्यांचे, चाहत्यांचे, सहकाऱ्यांचे आणि राजकारण्यांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले.