वांद्रे येथील बँडस्टॅण्ड येथे फिरण्यासाठी आलेल्या जोडप्यामध्ये वाद होऊन प्रियकराने प्रेयसीचे डोके दगडाने ठेचल्याची घटना बुधवारी रात्री घडली. गंभीररीत्या जखमी झालेल्या २८ वर्षीय प्रेयसीला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. जखमी तरुणी आणि तिचा प्रियकर हे कल्याण येथे राहणारे असून बुधवारी मुंबईत फिरण्यासाठी आले होते. लग्नाच्या विषयावरून दोघांत वाद होऊन ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लुबाना जावेद सकेत (२८)असे प्रियकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. लुबाना ही कल्याण मधील कोनगाव येथे राहण्यास असून प्रियकर आकाश मुखर्जी हा कल्याणच्या खडकपाडा येथे राहणारा आहे. लुबाना सोबत लग्न करण्यासाठी आकाश याने धर्मांतर केले आहे.
बुधवारी दोघे सकाळी मुंबईत फिरण्यासाठी आले होते, मुंबई फिरून झाल्यानंतर सायंकाळी दोघे वांद्रे बँडस्टॅण्ड येथे आले. समुद्र किनारी दगडाच्या आडोशाला दोघे बसून गप्पा मारत होते, रात्रीचे १० वाजले उशीर झाल्यामुळे लुबाना ही घरी जाण्यासाठी हट्ट करू लागली, परंतु अजून थोडा वेळ बसू त्यानंतर तुला टॅक्सीने घरी सोडतो असे म्हणाला. मात्र लुबाना ही घरी जाण्यासाठी रडू लागली असता आकाशने तिला समजावत “मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात परिवर्तन केले आहे, त्याचे प्रमाणपत्र तुझ्या मावशीला दाखवू आणि लग्नासाठी संमती मिळवू, असे तो लुबानाला सांगू लागला.
परंतु लुबाना काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्यामुळे संतप्त झालेल्या आकाशने तोंड दाबून तिचे डोके दगडावर आपटण्यास सुरुवात केली, रक्तबंबाळ होताच लुबाना बचावासाठी हाका मारु लागली. बँड स्टॅण्डच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून आवाजाच्या दिशेने धाव घेतली, लुबाना ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, लोकांनी चौकशी केली असता आकाशने त्यांना ती दगडावर पडल्याचे खोटं सांगू लागला, परंतु काही तरी गडबड असल्याचे लोकांच्या लक्षात येताच जमाव आकाशच्या दिशेने येऊ लागताच आकाशने समुद्राच्या दिशेने पळ काढला.
हे ही वाचा:
आमदार भातखळकरांच्या प्रयत्नांमुळे कांदिवली स्थानकातला सरकता जिना होणार सुरू
विरोधकांनी नव्या संसदभवनाकडे तोंड फिरवले; पण चीनने केले कौतुक
राहुल गांधी यांनी दुसऱ्या दिवशीही अमेरिकेत मदतीसाठी पदर पसरला
कर्नाटकनंतर आता राजस्थान काँग्रेस सरकारकडून ‘फुकट’ची वीज
जमलेल्या जमावापैकी काही जणांनी आकाशला पकडले व पोलिसांना कॉल करून कळविण्यात आले. वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी लुबानाला तात्काळ पोलीस व्हॅन मध्ये बसवून नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून तिचा प्रियकर आकाशला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. जखमी लुबाना ही शुद्धीवर येताच पोलिसांनी तीचा जबाब नोंदवून आकाश मुखर्जी यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.