खासदार संजय राऊत यांच्या धमकीप्रकरणात पुण्यातून एका तरूणास पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल तळेकर (वय -२३,रा. वडगाव शेरी, पुणे) असे या तरुणाचे नाव असून पुणे पोलिसांनी त्यास पुढील तपास करण्याकरता मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी येथे माध्यमांना दिली आहे.
संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई या कुख्यात टोळीच्या नावाने धमकीचा मेसेज आला होता. खराडी चंदननगर परिसरातून एका हॉटेलमधून राहुल तळेकर यास ताब्यात घेतले आहे. तळेकर हा एका हॉटेलमध्ये काम करत आहे. त्याने अशाप्रकारचे कृत्य कशासाठी केले आहे, तसेच त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी नेमका काय संबंध आहे, याबाबतचा तपास पोलिस करत आहेत.
हे ही वाचा:
संजय राऊत याना बजावली १०० कोटींची मानहानीची नोटीस
सांगली सहकारी बँकेच्या संचालकपदी हेमंत शिंदे
भारत-इस्रायल देणार दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवी दिशा
फाटक इन्चार्ज दारू प्यायला वांगणीला, नागरिकांचा जीव तासभर टांगणीला
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एके ४७ ने उडवून देऊ असे धमकी देणाऱ्याने म्हटले होते. यासंदर्भात तळेकर या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
यासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, धमकी देणारी व्यक्ती दारूच्या नशेत होती, अशी प्राथमिक माहिती हाती आलेली आहे. पण त्याचा संपूर्ण तपास केला जाईल. राज्यात धमकी दिली गेली तर पोलिस स्वस्थ बसणार नाहीत. कोणत्याही व्यक्तीवर कारवाई केलीच जाईल.
फडणवीस यांनी सांगितले की, जे लोक चुकीचे काम करतील त्यांच्यावर कारवाई ही होणारच. कायद्याने हे राज्य चालले आहे.