१५ वर्षीय मुलीवर व तिच्या आईवर चाकूने हल्ला करून ३० वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चेंबूर शेल कॉलनी येथे बुधवारी रात्री घडली. या हल्ल्यात मुलगी आणि तिची आई गंभीरीरित्या जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी मृत इसमाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुषमा सिंह (३५) आणि आंचल सिंह (१५) असे जखमी मायलेकीचे नावे असून राहुल निषाद मृताचे नाव आहे. चेंबूर शेल कॉलनी येथील साईबाबा नगर या ठिकाणी सुषमा ही पती आणि दोन मुलांसह राहण्यास आहे. सुषमा हिचे पती चेंबूर उड्डाण पूलाखाली रुमाल विक्रीचा धंदा करतात त्याच परिसरात राहुल हा एक भाजी विक्रेत्याकडे मजुरीचे काम करीत होता.
राहुल आणि सुषमाचे पती यांच्यात मैत्री होती. कोरोना काळात सर्व बंद असतांना राहुल हा सुषमाच्या घरी जेवायला येऊ लागला होता. त्यानंतर तो गावी निघून गेला होता. काही महिन्यांपूर्वी तो मुंबईत पुन्हा आला व त्याने दोन महिन्यापासून सुषमा यांच्या घरी जेवायला येणे बंद केले होते.
बुधवारी रात्री ९च्या सुमारास राहुल अचानक सुषमा यांच्या घरी आला त्यावेळी घरात केवळ सुषमा आणि मुलगी आंचल या दोघी होत्या, राहुल याने घरात येताच त्याने आतून दाराला कडी लावली व काही कळायच्या आत त्याने सोबत आणलेला चाकू काढून सुषमा आणि आंचल यांच्यावर वार केले. सुषमा आणि आंचल यांनी त्यांच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करून दार उघडून बाहेर आल्या व बाहेरून दार लावून पतीला फोन करून बोलावून घेतले.
हे ही वाचा:
कॅनडा प्रमुख ट्रुडोच खरे सूत्रधार?
महिंद्र अँड महिंद्रची कॅनडातील उपकंपनी बंद
कॅनडानंतर तुर्कीचा भारताशी पंगा
हे आहेत कॅनडाशी संबंधित दहशतवादी !
या घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुषमा सिंह आणि आंचल सिंह यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आले, सिंह यांचे दार उघडले असता राहुल हा रक्ताच्या थारोळ्यात घरात पडला होता, त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकूने वार केल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी त्याला राजवाडी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
राहुल निषाद हा मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगड येथे राहणारा असून त्याचे काही नुकतेच लग्न झाले होते, त्याने मायलेकीवर हल्ला करून स्वतः आत्महत्या का केली याबाबत काही कळू शकलेले नसल्याचे पोलीसांनी सांगितले.याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी मृत इसमाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.