मामाने चोरीचा आरोप केल्यामुळे संतापलेल्या एका १६ वर्षाच्या मुलाने तलवार घेऊन रस्त्यावर गोंधळ घालत बेस्ट बससह काही वाहनांची तोडफोड केल्याची घटना भांडुप पश्चिम येथे शनिवारी दुपारी घडली.
याप्रकरणी भांडुप पोलिसांनी या विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची रवानगी डोंगराच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
भांडुप पश्चिम टॅंक रोड येथे शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक तरुण हातात तलवार घेऊन रस्त्यावर लोकांना शिवीगाळ धमक्या देत होता, त्याच्या हातात तलवार बघून अनेकांनी त्याच्यापासून दूर राहणे पसंत केले. लोक आपल्याला घाबरताय हे बघून या तरुणाला आणखी चेव आला. त्याने रस्त्याच्या कडेला पार्क असलेल्या रिक्षा तसेच इतर वाहनांच्या तलवारीने काचा फोडल्या, एवढ्यावर न थांबता त्याने प्रवाशांनी भरलेली बेस्ट बस थांबवली, बस चालकाला शिवीगाळ करीत त्याने बसच्या पुढच्या काचा तोडल्या तसेच बसमध्ये चढून प्रवाशांना धमक्या देऊ लागला.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये भूकंपचा धक्का
टी२० चा सम्राट आता अमेरिकेत उडवणार चौकार-षटकारांची आतषबाजी
हा सर्व प्रकार अनेक जण आपल्या मोबाईल कॅमेरात कैद करीत होते. या घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी टॅंक रोड येथे धाव घेऊन तलवारीसह या तरुणाला ताब्यात घेऊन पोलीस पोलीस ठाण्यात आणले असता हा तरुण १६ वर्षाचा अल्पवयीन मुलगा असल्याचे कळले. त्याच्याकडे चौकशी केली असता मामा मला चोर म्हणाला म्हणून माझे डोके फिरले होते असे त्याने पोलिसांना सांगितले.
भांडुप पोलिसांनी या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ ७) विजयकांत सागर यांनी दिली.