राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपा नेते जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, या आरोपांवर जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण देत आरोप करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल केला होता. यानंतर आता जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटींची खंडणी रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी आरोप करणाऱ्या महिलेने तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील एक कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना महिलेला अटक करण्यात आली आहे.
२०१६ मध्ये जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवले होते, असे आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर जयकुमार गोरे यांना अटक होऊन ते दहा दिवस तुरुंगातही होते. २०१९ मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर या प्रकरणाला पुन्हा एकदा खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार यांनी चर्चेत आणले होते.
हे ही वाचा :
हमासचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या बदर खानच्या हद्दपारीला स्थगिती
२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने लावली बोली
अनिल परब तुमच्या सरदारांना विचारा संजय राठोडांना क्लीन चीट का दिली?
लष्कराला मिळणार बळकटी; स्वदेशी प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम खरेदीला मंजुरी
जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे सांगत हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा विनयभंग केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. रोहित पवार यांनीही यावर भाष्य केले होते. तर लयभारी युट्युब चॅनेलही बदनामी करत असल्याचा दावा जयकुमार गोरे यांनी केला होता. या संदर्भात बोलताना जयकुमार गोरे यांनी म्हटले होते की, सदर प्रकरणात न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. ज्यांनी आरोप केले, त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार. त्यानंतर त्यांनी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. यात संजय राऊत, रोहित पवार यांच्यासह लयभारी नावाचे युट्युब चॅनेल यांचाही समावेश होता.