सायन रुग्णालयाच्या आवारात डॉक्टरच्या मोटारीने दिलेल्या धडकेत ५८ वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सायन पोलिसकडून शनिवारी रात्री उशिरा डॉक्टर राजेश डेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ. डेरे यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांनी दिली.
जुबेदा शेख (५८)असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. जुबेदा शेख या मुंब्रा कौसा येथील गुलाम नगर येथे आपल्या कुटुंबियासह काही वर्षापूर्वी राहण्यास आलेल्या होत्या.त्यांचे कुटुंब पूर्वी वांद्रे पूर्व येथे राहत होते. जुबेदा यांना दोन मुलगे आणि दोन विवाहित मुली आहे जुबेदा यांचे पती मुंबईत एका खाजगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, एक मुलगा डिलिव्हरी बॉय असून दुसरा मुलगा खाजगी नोकरी करतो.
जुबेदा यांना मधुमेहाचा आजार होता, व त्यात यांच्या हाताला जखम होऊन ती जखम चिघळल्याने दोन आठवड्यापूर्वी त्या सायन रुग्णालयात दाखल झालेल्या होत्या. १६ मे रोजी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती, जखम झालेल्या हातात मलम पट्टी करण्यासाठी मागील चार दिवसांपूर्वी जुबेदासायन रुगणालयात येत होत्या.अशी माहिती जुबेदा यांचा मोठा मुलगा शहनवाज याने सांगितले.
शुक्रवारी जुबेदा या मलमपट्टी करण्यासाठी सायन रुग्णालयात आल्या होत्या, सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास त्या उपचार घेऊन घरी जाण्यासाठी रुग्णालयातुन बाहेर पडत असताना सायन रुग्णालयाच्या गेट क्रमांक ७ येथे रुग्णालयांच्या आवारात त्यांना एक मोटारीने धडक दिली. जुबेदा ज्या मोटारीखाली आल्या, ती मोटार सायन रुग्णालयाच्या न्याय वैद्यक विभागाचे डॉक्टर राजेश डेरे हे चालवत होते.
हे ही वाचा:
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सरासरी ५७.०७ % मतदान!
‘१५ कोटी पार….’ वाले मतदार कोणाच्या बाजूला?
पुणे अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे रॅप साँग तयार करणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल
पुणे पोलिसांकडून सुरेंद्र अग्रवालच्या घरावर छापेमारी!
रात्री उशिरा या अपघाताची माहिती सायन पोलिसांना देण्यात आली, सायन पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मृत महिलेची ओळख शनिवारी दुपारी पटली असता पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबियांना कळविण्यात आले.
दरम्यान, सायन पोलिसांनी सायन रुग्णालय परिसरात झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन शनिवारी रात्री उशिरा सायन पोलीस ठाण्यात डॉ. राजेश डेरे यांच्या विरुद्ध भादवी. कलम ३०४(अ ) ( बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू स कारणीभूत) दाखल करण्यात आला असून डॉ. डेरे यांना अटक करण्यात येणार असल्याचे परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.