पुण्यात आणखी एका बलात्काराच्या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. १९ वर्षीय महिलेच्या पतीच्या चुलत भावाने आणि त्याच्या मित्राने या विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या महिलेचा नंतर गळा दाबून खून करण्यात आला आणि दगडाने चेहरा ठेचून पुरावा नष्ट कऱण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या महिलेच्या दीराला अटक केली आहे पण अन्य आरोपीचा शोध जारी आहे.
पुण्यात मागे १४ वर्षांच्या मुलीवर तब्बल १३ जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर महाराष्ट्रात मुंबई, अमरावती याठिकाणीही बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. आता या बलात्कार आणि खुनाच्या नव्या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
रविवारी ही घटना घडली होती पण आता त्याचे धागेदोरे सापडू लागले आहेत. या दुर्दैवी महिलेच्या पतीचा एक नातेवाईक आणि त्याचा मित्र यांनी या महिलेवर बलात्कार केला. नंतर ओढणीने तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली. शिवाय, तिच्या चेहऱ्यावर दगड टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही या आरोपींनी केला आहे.
नवऱ्याच्या नातेवाईकांसोबत मंदिरात गेलेली असताना या महिलेसोबत हा भयंकर प्रकार घडला आहे. पुण्यातील पिंपरी येथे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
हे ही वाचा:
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या ताफ्यात ‘बॉडी’गार्ड
डॉक्टरांच्या ‘मार्ड’ने विचारला सवाल… कुठे आहे शैक्षणिक फी माफीचे आश्वासन?
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे ‘सव्वा’पसव्य
पुण्यातील गिर्यारोहकांनी सर केली ६५१० मीटर उंची
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता प्रकट केली होती. तसेच यासंदर्भात दोन दिवसांचे अधिवेशन बोलावले पाहिजे असेही म्हटले होते. पण त्यावर मुख्यमंत्र्यांनीच राज्यपालांना पत्र लिहून त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आता या नव्या घटनेमुळे राज्यपालांचे म्हणण्यावर मुख्यमंत्री गांभीर्याने विचार करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.