अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शबिना शेख असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून ती भाईंदर जवळील पूजानगरची रहिवासी आहे. महिलेची मावस बहिण मिनाज मुजावर आणि तिचा मुलगा नौशाद यांनी तिला डॉलरमध्ये गुंतवणूक करण्याची कल्पना सुचवली होती. नफा मिळण्याच्या आमिषाने महिलेने स्वतःचे घरही विकले.
पूजानगर येथील प्रीमियम अपार्टमेंटमध्ये शबिना शेख राहतात. त्यांना त्यांच्या मावस बहिणीने अमेरिकी डॉलरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. १ लाखांच्या गुंतवणुकीत ६ हजारांचा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. बहिणीच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन शबिना यांनी १६ लाख रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने ५ लाख ५९ हजारांचा नफा झाला. त्यानंतर शबिना यांच्या बहिणीने त्यांना अधिक पैसे टाकलेत तर अजून फायदा होईल, असे सांगितले. राहते वन बीएचके घर विक आणि पुढच्या वर्षी दोन बीएचके घे, असेही सांगितले. शबिना यांचाही विश्वास बसल्यामुळे त्यांनी स्वतःचे घर विकून पैसे गुंतवले.
हे ही वाचा:
‘पांढऱ्या हत्तीं’वर अनधिकृत फेरीवाल्यांनी मांडले ठाण
अरेरे! ‘त्या’ अंगरक्षकाने अखेर बोट गमावले
सिद्धार्थच्या निमित्ताने नवी चिंता; युवकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण का वाढते आहे?
पाच महिन्यांची गर्भवती खेळतेय व्हॉलीबॉल
शबिना यांनी सप्टेंबर २०२० मध्ये ३० लाख रुपये गुंतवले. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी पैसे मागताच लॉकडाऊनचे कारण देत पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे शबिना यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. फसवणूक करणारी मावस बहिण मिनाज आणि तिचा मुलगा नौशाद सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.