पावसाळ्याच्या दिवसात धबधबे, समुद्रकिनारा धोकादायक असतो. तिथे सावधगिरी बाळगण्याचे आणि अतिधाडस करू नये अशा सूचना असतानाही काहीजण धाडस करतात आणि त्यात प्राणांवर बेतते. बांद्रा बँडस्टँड येथील समुद्रात असलेल्या दगडांवर बसलेल्या जोडप्यापैकी एक महिला वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली.
सगळे कुटुंबीय पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी रेक्लेमेशनला आले होते. तेव्हाच लाटेने या महिलेला ओढून नेले. ज्योती सोनार असे या महिलेचे नाव असून तिचे पती आणि मुलांना मात्र हे पाहात बसावे लागले. ते काहीही करू शकले नाहीत. अगदी काही क्षणात होत्याचे नव्हते झाले.
या कुटुंबियांनी याआधी जुहू चौपाटीला जाण्याचे ठरविले होते. पण तिथे भरतीमुळे त्यांनी बांद्र्याला जाण्याचे ठरविले. बांद्र्याच्या त्या किल्ल्याजवळ पोहोचल्यावर हे कुटुंब फोटो घेण्यासाठी समुद्राजवळ गेले. जोडपे समुद्रातील दगडांवर बसले होते तर मुले बाहेरून फोटो घेत होती. त्याचवेळी एक मोठी लाट आली आणि ज्योती यांना ओढून घेऊन गेली.
हे ही वाचा:
राहुल गांधी म्हणजे निराश ‘राजपुत्र’
भारतात पोहोचताच पंतप्रधानांनी घेतला दिल्लीच्या पूरस्थितीचा आढावा
ज्ञानव्यापी मशिदीतील कार्बन डेटिंगप्रकरणी २१ जुलै रोजी निर्णय
प. बंगालमधील रक्तरंजित निवडणुकांचे पाप माकप, काँग्रेसचे!
मुले आई आई म्हणून ओरडत होती पण ती काहीही करू शकली नाहीत. अगदी काही सेकंदातच ती ज्योती सोनार वाहून गेल्या. रबाळे येथील एक रहिवासी मुकेश यांनी ज्योती यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांची साडी त्याने पकडून ठेवली होती पण त्याला यश आले नाही. तिथे असलेल्या लोकांनी मुकेशचा पाय धरून ठेवला होता. त्यामुळे तो सुरक्षित राहिला.
त्यानंतर स्थानिकांना पोलिसांना कळविले. त्यानंतर तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केल्यावर ज्योती सोनार यांचे शव मिळाले. सोनार यांचा मृतदेह पोलिसांच्या हवाली करण्यात आला. त्यानंतर कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी तो मृतदेह नेण्यात आला.