मेट्रोच्या दारात साडी अडकून महिला मेट्रोखाली आल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना नवी दिल्लीतील इंद्रलोक स्थानकावर घडली. ही महिला मेट्रोत चढत होती की उतरत होती, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. या महिलेच्या पतीचे काही काळापूर्वी निधन झाले होते. ती आपल्या दोन मुलांची काळजी घेत होती.
१४ डिसेंबर रोजी ही घटना घडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमा गंभीर असल्याने दोन दिवसांनी म्हणजेच शनिवारी तिने प्राण सोडला. पश्चिम दिल्लीमधील नानग्लोई भागातून मोहन नगर येथे जात असताना हा अपघात झाल्याचे या महिलेच्या नातेवाइकाने सांगितले. आपल्या मुलासोबत प्रवास करत असताना तो मागे राहिल्याने ती मेट्रोतून पुन्हा माघारी फिरली पण तिची साडी अडकली आणि तेव्हा सुरू झालेल्या मेट्रोने तिला फरफटत नेले. त्यातच तिचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
पोप फ्रान्सिसचे माजी सल्लागार कार्डीनल अन्जेलो बेक्यूना तुरुंगवासाची शिक्षा
युद्धसमाप्तीनंतर गाझामध्ये ‘नागरी सरकार’ची स्थापना
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाआधी वॉशिंग्टनमध्ये उत्साहाची लाट
बिहारमध्ये डॉक्टरांची दारू पार्टी!
‘जेव्हा ती मेट्रोच्या इंद्रलोक स्थानकावर पोहोचली आणि ती रेल्वेगाडी बदलत होती, तेव्हा तिची साडी मेट्रोच्या दारात अडकली. मेट्रोचे दार बंद झाल्याने ती खाली पडली आणि तिला गंभीर जखमा झाल्या. तिला त्याच गंभीर अवस्थेत सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला,’असे या नातेवाइकाने सांगितले. या महिलेच्या पतीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे. रिना असे या महिलेचे नाव आहे.
रिना यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे व्हेन्टिलेटर नसल्याने दाखल करता आले नाही. इतर रुग्णालयातही नेण्यात आले पण त्यांनीही रिना यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. शेवटी सफदरजंग रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता.
‘ही घटना १४ डिसेंबर रोजी इंद्रलोक मेट्रो स्थानक येथे घडली. प्राथमिक तपासात तरी या महिलेची साडी ट्रेनमध्ये अडकून ती जखमी झाल्याचे आणि शनिवारी तिचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे,’ असे दिल्ली मेट्रोचे मुख्य प्रसारमाध्यम अधिकारी अनुज दयाल यांनी सांगितले. मेट्रो रेल्वे सुरक्षा प्राधिकरणाचे आयुक्त या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे दयाल यांनी सांगितले. मेट्रोचे दार बंद होताना तिची साडी अडकली आणि ती गाडीखाली आल्याचे सांगितले जाते. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत आणि गरज लागल्यास कायदेशीर मतही घेतले जाईल,’ असे दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.