सांताक्रूझ येथील कापड व्यवसायिकाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली त्याची पत्नी काजल आणि तिचा प्रियकर हितेश जैन यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या दोघांच्या पोलीस कोठडीत १२ डिसेंबर पर्यत वाढ केली आहे. हितेश आणि काजल या दोघांनी कमलकांत शहा या कापड व्यवसायिकाची हत्या करण्याचा कट हॉटेलमध्ये रचला होता, त्यानंतर हत्या करण्यासाठी विषाचा शोध घेण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला होता असेही तपासात समोर आले आहे.
सांताक्रूझ येथील कापड व्यवसायिक कमलकांत शहा याचा मृत्यु आर्सेनिक आणि थेलियम या विषारी धातू शरीरात जास्त प्रमाणात गेल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले, आणि हे विषारी धातू त्याची पत्नी काजल आणि तिचा प्रियकर हितेश जैन कमलकांतच्या अन्नातून थोडे थोडे करून एक महिन्यापासून त्याला देत होते हे पोलीस तपासात उघड झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने कमलकांत यांच्या मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून १ डिसेंबर रोजी पत्नी काजल आणि तिचा प्रियकर हितेश जैन या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर गुन्हे शाखेने त्यांना गुरुवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
हे ही वाचा:
मीराबाई चानूचे ‘दोनशे टक्के’ यश
नाशिककरांची ८ तारीख ठरली ‘अपघाताची’
चालत्या ट्रेनमध्ये दरोडा टाकणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
काजल आणि हितेश या दोघांनी कामलकांत याच्या हत्येचा कट हॉटेलमध्ये रचल्याची कबुली पोलिसांना दिली आहे, तसेच त्याने विष शोधण्यासाठी गुगल सर्च इंजिनचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता, व थेलीयम हे विष ऑनलाइन मागविण्याचा प्रयत्न त्याने केला होता असे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
तसेच हितेश याने कमलकांतच्या मृत्यूनंतर स्वतःचा मोबाईल फोन आणि सिम कार्ड नाशिक हायवे या ठिकाणी फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. तसेच काजल हिने पोलीस आणि इतर नातेवाईकांची आपल्यावरील संशय दूर करण्यासाठी स्वतः कमी प्रमाणात थेलीयम पाण्यात मिसळून प्याली जेणेकरून तिच्या रक्त चाचणीत थेलीयम मिळून यावे व तिच्यावरील संशय दूर व्हावा, हे सर्व करताना काजल हे सर्व शांत डोक्याने करीत होती अशी माहिती काजलच्या चौकशीत समोर आली आहे. पोलिसांना पुढील तपास करण्यासाठी न्यायालयाने या दोघांच्या पोलीस कोठडी १२ डिसेंबर पर्यत वाढ केली आहे.