पतीच्या संशयी वृत्तील कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. पत्नीच्या मोबाईलमध्ये ठेवलेला मित्रांसोबतचा सेल्फी बघून पतीने संशय घेतला. म्हणून पत्नीने ट्रेनखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या विक्रोळी भागात घडली.
संजना हर्षद शेरे (२७) असे ट्रेनखाली आत्महत्या करणाऱ्या दुर्देवी विवाहितेचे नाव आहे. विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर येथे राहणाऱ्या हर्षद शेरे याच्यासोबत दोन वर्षांपूर्वी संजनाचा विवाह झाला होता. संजना हिचे पदवी पर्यत शिक्षण झाले असून ती मुंबईत एका खासगी कंपनीत एचआर म्हणून नोकरी करीत होती. संजनाने तिच्या मित्र मैत्रीणीसोबत काढलेला एक सेल्फी तिच्या मोबाईल फोनवर ठेवला होता. हा सेल्फी बघून पती हर्षद हा संजनावर संशय घेऊन तीला मारझोड करू लागला होता. हे भांडण संजनाच्या माहेरपर्यत कळले होते.
हे ही वाचा:
पाक समर्थक इम्रान खानला अमेठीत अटक
शिवसेनेच्या प्रदीप शर्मांवरही आता खंडणीचा आरोप
पंतप्रधान मोदींची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा
७ मे रोजी सकाळी १० वाजल्याच्या सुमारास विक्रोळी रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ३ येथील कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद ट्रेनच्या रुळावर मान ठेवुन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी संजनाने मोबाईल मध्ये मेसेज टाईप करून वडील आणि भावाच्या व्हॉटसऍपवर पाठवला होता, त्यात तीने पतीची संशयी वृत्ती आणि सासू-सासऱ्यांचा होणारा जाच याबाबत उल्लेख केला आहे. “माझे चारित्र्य स्वच्छ असून मी पती हर्षद यांच्यावर खूप प्रेम करत होते. त्यानेच माझ्यावर संशय घेतला तर मी जगून काय करू? मी माझे जीवन संपवत आहे.” असे तीने मेसेजमध्ये म्हटले आहे.
मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच संजनाच्या वडिलांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत संजनाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती आणि सासू-सासरे यांच्या विरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास विक्रोळी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.