अंधेरी येथे एका ५५ वर्षांच्या बँक व्यवस्थापकाची पत्नीने आणि मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली.
संतन कृष्णन शेषाद्री असे या बॅक व्यवस्थापकाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी जयशिला संतन शेषाद्री (५२) आणि मुलगा अरविंद संतन शेषाद्री (२६) या दोघांना आंबोली पोलिसांनी अटक केली. या दोघांनी संतनची हत्या करुन त्याने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन आत्महत्या केल्याचे चित्र निर्माण केले होते, मात्र आंबोली पोलिसांच्या सतर्कमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला असून या दोघांनाही शनिवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.
या वृत्तासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांनी सांगितले की, संतन हे अंधेरीतील विरा देसाई रोडवरील एका खाजगी बँक वसाहतीत त्यांच्या पत्नी जयशिला आणि मुलगा अरविंद यांच्यासोबत राहत होते. ते सध्या एका सरकारी बँकेत सहाय्यक मॅनेजर म्हणून काम करीत होते. त्यांचे जयशिलाशी मनाविरुद्ध विवाह झाला होता. त्यामुळे त्यांच्यात पटत नव्हते. सतत कौटुुंबिक कारणावरुन त्यांच्यात खटके उडत होते. अनेकदा पैशांवरुन त्यांच्यात कडाक्याचे भांडण होत होते. सततच्या भांडणाला कंटाळून जयशिलाने अरविंदच्या मदतीने संतन यांच्या हत्येची योजना बनविली होती.
शुक्रवारी पहाटे चार ते पाचदरम्यान त्यांनी बेडरुममध्ये संतनची डोके आपटून हत्या केली. हत्येनंतर त्यांच्या हाताची नस कापून त्यांनी घराच्या सातव्या मजल्यावरील गॅलरीतून त्यांना ढकलून दिले. पहाटे अचानक मोठा आवाज आल्याने स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली होती, यावेळी त्यांना संतन हे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच आंबोली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. संतन यांना तातडीने पोलिसांनी कूपर रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पत्नी आणि मुलाची चौकशी केल्यानंतर त्यांनी संतन यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र पंचनामा करताना पोलिसांना भिंतीवर रक्ताचे डाग दिसून आले. ते दोघेही पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचा अंदाज येताच पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत त्यांनीच ही हत्या करुन आत्महत्येचा चित्र निर्माण केल्याची कबुली दिली.
हे ही वाचा:
राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास
‘ही तर संजय राऊतांची कोल्हेकुई’
‘करदात्यांच्या पैशाच्या कुरणात तिन्ही पक्ष चरतात’
संतन यांच्यावर मानसिक उपचार सुरु होते. त्यातून त्यांनी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र तिसर्या वेळेस त्यांनी आत्महत्या केली असे त्यांनी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कमुळे तसेच सतत केलेल्या चौकशीतून त्यांनी या हत्येची कबुली दिली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी दोन्ही मायलेकांना अटक केली. या दोघांनाही शनिवारी कोर्टात हजर केले जाणार आहे.