वक्फ सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील याला मंजूरी दिली आहे. त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं. दरम्यान, हे विधेयक मंजूर होण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात होत्या. अशातच वक्फ सुधारणा विधेयकाला समर्थन दिल्याने भाजपाच्या एका नेत्याचे घर पेटवून दिल्याची धक्कदायक घटना मणिपूरमध्ये घडली आहे.
मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील मणिपूर भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष अस्कर अली मक्कामय्युम यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला समर्थन दिले होते. यानंतर संतप्त जमावाने त्यांच्या घरासमोर जमा होत निवासस्थानाची तोडफोड करत घराला आग लावली. अस्कर अली यांनी नुकत्याच मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला समर्थन दिलं होतं. पण अस्कर अली यांनी या विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्याविरोधात एक गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मणिपूर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली, तसेच पोलिसांनी निदर्शकांना रोखलं.
ही घटना घडल्यानंतर अस्कर अली यांनी माफी मागितली असून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारला वक्फ सुधारणा विधेयक मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संमतीनंतर आता कायदा झालेल्या वक्फ विधेयकावरून राजकारण करू नका, असं आवाहनही अस्कर अली एका फेसबुक पोस्टमध्ये केलं आहे.
हे ही वाचा :
भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या सोमय्यांना धमकी; काय म्हणाले किरीट सोमय्या?
कुपवाड्यातील छाप्यात सापडली चिनी बनावटीची दुर्बीण, मशिनगन, हॅन्डग्रेनेड!
टॅरिफ वॉरमुळे शेअर बाजार गडगडला; जगात काय परिस्थिती?
रविवारी, देशभरात वक्फ विधेयकातील सुधारणांविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यात इम्फाळच्या क्षत्री अवांग लीकाई, कैरांग मुस्लिम, कियामगेई आणि इतर मुस्लिम बहुल भागांचा समावेश होता. लिलाँग येथील निदर्शनात, वक्फ विधेयकात केलेल्या बदलांना आक्षेप नोंदवण्यासाठी ५,००० हून अधिक लोकांनी राष्ट्रीय महामार्ग १०२ रोखला. या मोठ्या निदर्शनामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये बाचाबाची झाली.