मुंबईतील चार अधिकाऱ्यांपाठोपाठ आता चकमक फेम दया नायक यांची मुंबई बाहेर बदली करण्यात आली आहे. या प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांना मुंबईबाहेर बदली करण्यामागील नेमके कारण काय, त्यांना मुख्य प्रवाहाबाहेर काढण्याची गरज काय, असे प्रश्न यामुळे उपस्थित होऊ लागले आहेत.
हेही वाचा:
वादग्रस्त पोलिस अधिकारी दया नायक यांची बदली
खुशखबर!! आरोग्य खात्यात भरणार १६ हजार पदे
‘मुंबई पोलिस रश्मी शुक्लांना अटक करू शकत नाहीत’
कोविड लसींना पेटंटच्या पिंजऱ्यातून सोडवण्यास अमेरिकेचा पाठिंबा
दया नायक हे राज्य दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथून थेट गोंदिया जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबई गुन्हे शाखेचे टॉपचे अधिकारी पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, नंदकिशोर गोपाळे, सचिन कदम आणि केदारी पवार यांची मुंबईबाहेर बदली केल्यानंतर गुरुवारी चकमक फेम यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने दिले आहे. त्यामुळे एकामागोमाग एक अशा बदल्या त्याही मुंबईबाहेर का केल्या जात आहेत, याबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे.
दया नायक हे सध्या राज्य दहशत वाद विरोधी पथक मुंबई येथील जुहू युनिटचे प्रभारी म्हणून काही महिन्यापूर्वी पदभार स्वीकारला होता. यापूर्वी ते आंबोली पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून होते. गुरुवारी त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून त्यांना थेट गोंदिया जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग याठिकाणी बदली दाखवण्यात आली आहे.
ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे.
राजकुमार कोथमिरे हे चकमक फेम प्रदीप शर्मा यांच्या सोबत ठाणे खंडणी विरोधी पथकात होते. प्रदीप शर्मा यांच्या निवृत्ती नंतर खंडणी विरोधी पथकाचा कार्यभार राजकुमार कोथमिरे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. कोथमिरे यांनी ठाणे खंडणी विरोधी पथकाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांना अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. तसेच त्यांच्याविरोधात अनेक तक्रार अर्जही दाखल झाले होते. त्यामुळे ते ठाण्यातील वादग्रस्त अधिकारी ठरले होते.