ओडिशा रेल्वे अपघातात घातपात झाल्याचा रेल्वेला संशय असून त्यामुळेच या अपघाताची चौकशी सीबीआयने करावी, अशी शिफारस रेल्वेने केली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये काही फेरफार करण्यात आल्याचा रेल्वेला संशय आहे.
रेल्वे पोलिसांकडे स्थानके आणि रेल्वेची जबाबदारी आहे. परंतु अशा संशयित ‘गुन्हेगारी कृत्यांचा’ तपास करण्यासाठी ते सक्षम नाहीत. त्यामुळेच या अपघाताची प्रमुख तपास यंत्रणा सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे. ‘या घातपातामध्ये काही गुन्हेगार गुंतलेले असू शकतात, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
‘पॉइंट मशीनची सेटिंग बदलण्यात आली होती. ते कसे आणि का केले गेले, हे चौकशी अहवालात स्पष्ट होईल. या भयानक घटनेचे मूळ कारण ओळखले गेले आहे. मला तपशीलात जायचे नाही. अहवाल बाहेर येऊ द्या. मी एवढेच म्हणेन की गुन्हेगारी कृत्याचे मूळ कारण आणि त्यासाठी जबाबदार व्यक्ती ओळखल्या गेल्या आहेत,’ असे ते म्हणाले. रेल्वे अधिकाऱ्यांनीही घातपाताची शक्यता वर्तवली आहे. तसेच, गाड्यांच्या ठावठिकाणांबाबत सांगणाऱ्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये फेरफार झाल्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
फॉर फ्युचर इंडियाचे भाईंदरला स्वच्छता अभियान
एकाचा हात हाती दुसऱ्याला डोळा मारण्याच्या करामती; आंबेडकर सांगा कोणाचे?
बेपत्ता लोकांच्या शोधाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांचे डोळे डबडबले!
विक्रोळीतील म्हाडा वसाहतीत सापडले आई, मुलाचे मृतदेह
घातपाताची शक्यत का?
कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी वेगळ्या ट्रॅकवर, लूप लाइनवर कशी आली, हा मूळ प्रश्न आहे. हावडाहून चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य मार्गावरून जात होती. यापूर्वी एक मालगाडी हलवण्यात आली होती. हावडा-चेन्नई डाऊन कोरोमंडल एक्स्प्रेसला मार्ग देण्यासाठी ती लूप लाइनवर होती. मात्र एक्स्प्रेस ट्रेनला थेट मुख्य मार्गावरून जायचे होते. परंतु तसे झाले नाही. लूप लाइन या अधिक गाड्या सामावून घेण्यासाठी आणि सुरळीत कामकाजासाठी स्थानक परिसरात बांधल्या जातात. एकाहून अधिक इंजिनांसह पूर्ण-लांबीची मालगाडी सामावून घेण्यासाठी या लूप लाइन असतात. या लूप लाइनची लांबी साधारणत: ७५० मीटर असते. कोरोमंडल एक्स्प्रेस ही इंटरलॉकिंग सिस्टीममधील काही समस्यांमुळे, सरळ जाण्याऐवजी, लूप लाइनकडे निघाली आणि तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली.
या धडकेमुळे भयंकर अपघात झाला. मालगाडीवर आदळल्याने काही डबे अप लाईनवर फेकले गेले जिथे बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस धावत होती आणि ही ट्रेन शेवटच्या दोन डब्यांवर आदळली. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीनुसार, रेल्वेला ती पार्क केलेल्या मालगाडीकडे जाऊ नये, असा लाल सिग्नल मिळायला हवा होता, मात्र तो मिळाला नाही. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना यामागे घातपाताचा संशय वाटत आहे.
लोको पायलटला क्लीन चीट
रेल्वे बोर्डाने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या लोको पायलटला क्लीन चिट दिली आहे आणि इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये बदल झाल्याने अपघात झाल्याचे नमूद केले आहे. प्राथमिक निष्कर्षांनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेस अतिवेगात नव्हती आणि तिला मुख्य मार्गावरच मार्गक्रमणा सुरू ठेवण्याचा सिग्नल मिळाला होता, परंतु काही कारणास्तव या एक्स्प्रेसने लूप लाइनमध्ये प्रवेश केला.