अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे. वांद्रे पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने आरोपी धाकड राम याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात अभिनेता सलमान खान यांच्या कार्यालयाच्या ईमेल आयडी वर एक मेल आला होता, या मेलच्या माध्यमातून सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, त्यात लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डीबार याचा उल्लेख करण्यात आला होता. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात १८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसानी ज्या मेल वरून मेल पाठवण्यात आला होता त्याचा आयपी अड्रेस तपासला असता लंडन (युके) येथील असल्याचे समोर आले होते. दरम्यान या गुन्ह्याचा तपास वांद्रे पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता, वांद्रे पोलिसानी एक विशेष पथक या तपासकामी लावले होते. दरम्यान ईमेल पाठविणारा हा राजस्थान राज्यातील जोधपूर येथे असल्याची माहिती मिळाली.
वांद्रे पोलीस ठाण्याचे एक पथक जोधपूर येथे दाखल झाले होते. जोधपूरच्या लुनी पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार अधिकारी ईश्वर चंद पारीक यांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जोधपूरच्या ‘सियागो की धानी’ येथील रहिवासी धाकड राम बिश्नोई याच्या विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यांच्या तपासासाठी वांद्रे पोलिसांचे पथक राजस्थानला दाखल झाले होते, वांद्रे पोलिसांनी आम्हाला आरोपीची माहिती दिली, दरम्यान, वांद्रे पोलिसांसोबत आमच्या पोलीस ठाण्याचे पथक पाठवून धाकड राम बिष्णोई (२१) याला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.आरोपीला घेऊन मुंबई पोलिसांचे पथक रविवारी मुंबईला रवाना झाली अशी माहिती जोधपूर पोलिसांनी दिली.
हे ही वाचा:
खतरनाक आरोपी अतिकला उत्तर प्रदेशला नेणार; उमेश पाल हत्याकांड
सर्वसामान्य लोक आता सौरऊर्जेला सरावलेत!
‘मन की बात’मध्ये अवयव दानातून स्त्रीशक्तीचे दर्शन
खलिस्तानींच्या हल्ल्यांविरोधात भारताने कॅनडा सरकारला ठणकावले!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने हल्ल्यात ठार झालेल्या पंजाबी गायक सिद्धू मूसावालाच्या वडिलांनाही ई-मेल पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपी धाकड राम याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वयेही लुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबचा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मेलवर धमकी येण्यापूर्वी तिहार तुरुंगातील एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता की, सलमान खानला मारणे हे त्याच्या आयुष्याचे ध्येय आहे. काळवीट मारल्याबद्दल राजस्थानमधील बिश्नोई समाजाची त्यांच्या मंदिरात या अभिनेत्याने माफी मागितल्यास संपूर्ण परिस्थिती सुटू शकते, असे ही त्याने मुलाखतीत म्हटले होते. बिष्णोई समाज काळवीट हा पवित्र प्राणी मानतात.
काय होते काळवीट प्रकरण
जोधपूरमध्ये सलमान खानवर चार प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, दोन प्रकरणांमध्ये त्याच्यावर चिंकारा शिकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, एका प्रकरणात दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाने त्याला २०१८ मध्ये पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. चौथ्या प्रकरणात त्याला बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल शिक्षा झाली.