ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याच्याविरोधात पैलवान सागर राणा हत्या प्रकरणी लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यातच सुशील कुमार सागरला मारहाण करताना सीसीटीव्हीत कैद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुशील कुमार एका बड्या योगगुरुच्या आश्रमात लपून बसल्याचाही दावा केला जात आहे.
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या वादावादीनंतर पैलवानांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. यात जखमी झालेल्या २३ वर्षीय सागर राणा या पैलवानाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिस सुशील कुमारसह वीस आरोपींच्या मागावर आहेत. यापैकी काही जणांना रोहतकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींपैकी सुशील कुमारचा निकटवर्तीय भुरानेच हरिद्वारमधील एका योगगुरुच्या आश्रमापर्यंत आपण सुशीलला सोडून आल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दैनिक जागरण या वृत्तपत्राने यासंबंधी बातमी दिली आहे.
भुराच्या कबुलीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. भुरा पोलिसांची दिशाभूल तर करत नाही, याचा तपास केला जात आहे. भुरा पैलवानी करत असून ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याचा खास मित्र आहे. याशिवाय भूपेंद्र आणि अजयही सुशीलचे जीवलग आहेत. अजयचे वडील काँग्रेस नगरसेवक असल्याचा दावा केला जातो. तर भूपेंद्र विरोधात फरिदाबादमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे.
हे ही वाचा:
उद्यापासून २ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी होते तर लॉकडाऊन का वाढवला?
लसीकरणासाठी पैसा नाही म्हणणारे सोशल मिडियासाठी सहा कोटी खर्च करतायत
महाराष्ट्रात १ जूनपर्यंत ‘कडक निर्बंध’
छत्रसाल स्टेडियमवर ४ मे रोजी उशिरा कुस्तीपटू सागर राणाची हत्या केल्यानंतर सुशील कुमार आणि इतर पैलवान वेगवेगळ्या ठिकाणी लपले, असा दावा भुराने केला आहे. यानंतर प्रत्येकाने दिल्लीतून पळून जाण्याची योजना आखली आणि त्यासाठी सुशीलने भुरालाही बोलावलं होते. तो सुशीलला योगगुरुच्या हरिद्वारमधील आश्रमापर्यंत सोडून आला. यानंतर, भुरा परत आला आणि सुशीलने त्याचे सर्व फोन बंद केले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना सुशीलचे शेवटचे मोबाईल लोकेशनही हरिद्वारमधील सापडले आहे.