पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राजकीय पक्षांशी संबंधित लोकांना टार्गेट केले जात असल्याचे दिसत आहे. काल (२६ मार्च) रात्री उत्तर २४ परगणा येथे भाजप नेते अर्जुन सिंह यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या घराबाहेर बराच गोंधळ घातला. यावेळी हल्लेखोरांकडून भाजपा नेत्याच्या घरावर कच्चे बॉम्ब फेकण्यात आले आणि गोळीबारही झाला. हल्ल्यावेळी पोलीस बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप अर्जुन सिंह यांनी केला आहे. या घटनेनंतर अर्जुन सिंह यांच्या घरी अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
भाजप नेते आणि माजी खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा नेते सिंग आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी हल्लेखोरांचा पाठलाग केल्याचे वृत्त आहे. मात्र, हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. बराकपूरचे पोलिस आयुक्त अजय ठाकूर म्हणाले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. यामध्ये सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.