नागपाड्यात पाण्याची टाकी फुटून ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यु

३ जण गंभीर जखमी

बांधकाम साईटवर तात्पुरती बांधण्यात आलेली पाण्याची टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी नागपाड्यातील सिद्धार्थ नगर येथे घडली.

या दुर्घटनेत ४ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद घेण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या कामाठीपुरा पहिली गल्ली येथे असणाऱ्या सिद्धार्थ नगर जवळ महानगर पालिकेच्या इमारतीचे खाजगी विकासकाकडून पुनर्बांधणी सुरू आहे. बांधकाम साईटवर राहणाऱ्या कामगारांसाठी तिथे पाण्याची सिमेंटची टाकी बांधण्यात आलेली होती.

हे ही वाचा:

विनोद कांबळी म्हणाला, ही चूक पुन्हा होणार नाही!

केजरीवाल यांची ‘महिला सन्मान योजना’ अस्तित्वातच नाही? दिल्ली सरकारनेचं केले स्पष्ट

अन्सारुल्ला बांगला टीमच्या दोन दहशतवाद्यांना अटक

इस्लाम स्वीकारण्याच्या दबावामुळे हिंदू मुलीने जीवन संपवले

या बाधकाम साईटवर बुधवारी सकाळी मजुरांची काही मुले पाण्याच्या टाकीजवळ खेळत होती. तर एक मजूर महिला कपडे धूत होती. दरम्यान मजुरांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेली पाण्याची टाकी पूर्णपणे भरून वाहत असताना पाण्याच्या दबावाने टाकी फुटून टाकीचे सिमेंटचे तुकडे उडाले आणि जवळच खेळणाऱ्या मुले आणि मजूर महिलेला लागून लहान मुलांसह महिला मजूर जखमी झाले.

तेथील कामगारांनी तात्काळ जखमीना नजीकच्या रुग्णालयात आणले असता ९ वर्षांची खुशी खातून हिला मृत घोषित करण्यात आले असून गुलाम रसूल (३२), मिराज खातून (९)नजराणाबीबी (३२) हे तिघे जण जखमी झाले आहे. मृत मुलगी ही बांधकाम मजुरांची मुलगी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version