नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांची वॉर्ड ऑफिसरला मारहाण

नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांची वॉर्ड ऑफिसरला मारहाण

शासकीय कामकाज पार पाडणाऱ्या महापालिकेच्या वाॅर्ड ऑफिसर आणि तीन कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्याला दुखापत झाली आहे. तर पोलीसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली आहे.

महाराष्ट्रात सध्या कोविडचे थैमान सुरू असून राज्यात लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. या नियमावलीनुसार राज्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि फेरीवाले यांना सकाळी ७ ते ११ आपला व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही सोमवारी वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील नालासोपारा येथे या नियमांचे उल्लंघन करून फेरीवाले आपला व्यवसाय करत होते. ही माहिती मिळताच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ‘ब’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी मधुकर डोंगरे हे आपल्या तीन सहकाऱ्यांना घेऊन रेहमत नगर येथे गेले. रेहमत नगरचे रस्ते हे फेरिवाल्यांनी भरलेले होते आणि कोवीड नियमावलीचा फज्जा उडाला होता.

डोंगरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत या फेरीवाल्यांना व्यवसाय बंद करण्यास सांगितले. पण जमावाने त्यांनाच मारहाण केली. बघता बघता जमाव वाढत गेला आणि शेकडो लोक तेथे जमली. डोंगरेंच्या सहकाऱ्यांनी कसेबसे त्यांना तेथून बाहेर काढले. घडल्या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तिथे पोहोचले. पण जमाव काबूत येत नव्हता. अखेर अतिरिक्त पोलीसांना बोलवण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. फेरीवाल्यांनी पळ काढला आणि प्रशासनाने त्यांचे ठेले जप्त केले.

हे ही वाचा:

ब्रेट लीकडून भारताला ४० लाखांची मदत

फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे काय दिला इशारा?

१० राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

लसीकरणाचा गुंता सुटणार कधी?

या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अर्थात सरकारी कामकाजात बाधा आणणे आणि ३३२ अर्थात दंगल भडकवणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version