बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीस कोर्टात सुरुवात झाली असून त्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जो युक्तिवाद केला त्यातून वाल्मिक कराड हाच यातील प्रमुख आरोपी असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील आरोपी व्हीडिओच्या माध्यमातून सुनावणीसाठी उपस्थित होते. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात पुढील सुनावणी आता १० एप्रिल रोजी होणार आहे.
बुधवारी सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती होती. वाल्मीक कराड याचे वकील विकास खाडे व त्यांचे वकील न्यायालयात उपस्थित होते. निकम यांनी जो सविस्तर युक्तिवाद केला तो असा-
आवादा ही एक ऊर्जा कंपनी आहे. या कंपनीने मासाजोग शिवारात ३२ एकर जमिनीवर गोडाऊन केले. त्या ठिकाणी सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत. येथील खंडणी प्रकरणाला ८ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. आठ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे, वाल्मीक कराड यांच्यासोबत कंपनीच्या अधिकारी शिवाजी थोपटे यांची बैठक झाली. वाल्मीक कराड याने दोन कोटीची खंडणी मागितली आणि ती नाही दिली तर काम थांबवा. असे सांगितले.
९ ऑक्टोबर २०२४ रोजी थोपटे यांनी आवादा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांना फोनवरून दोन कोटीची खंडणी मागितल्याचे माहिती दिली. पोलिसात तक्रार द्यावी का? अशी विचारणा केली. त्यावेळी अल्ताफ तांबोळी यांनी तक्रार देऊ नका, असे सांगितले. त्यामुळे या घटनेचा गुन्हा त्यावेळी नोंद झाला नाही.
२६ नोव्हेंबर २०२४ कराड गँगचा प्रमुख सुदर्शन घुले साडेअकरा वाजता साइटवर गेला. शिवाजी थोपटे याला धमकी दिली. कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करा, असे सांगितले. वाल्मीक कराडने सुदर्शन घुलेमार्फत हा मेसेज दिला.
२९ नोव्हेंबर २०२४ सकाळी साडेअकरा वाजता वाल्मीक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदे यांना फोन केला. घुले म्हणाला त्याप्रमाणे काम करा, अन्यथा कंपनी बंद करा, असे सांगितले. यावेळी सुनील शिंदे यांनी आपला फोन स्पीकरवर ठेवला होता. तो शिवाजी थोपटे हे ऐकत होते. थोपटे याने वाल्मीक कराडचा आवाज ओळखला. शिवाय हा कॉल सुनील शिंदे यांनी रेकॉर्डही केला होता.
हे ही वाचा:
सीबीआय टीमवर हल्ला, तीन अधिकारी जखमी
पाकिस्तानात राहतोय का? ‘आप’ आमदाराचा स्वतःच्या सरकारलाचं प्रश्न
कुणाल कामरा, सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव
झारखंडमधील हजारीबाग येथे रामनवमीनिमित्त निघालेल्या मंगला मिरवणुकीत दगडफेक
२९ तारखेला दुपारी एक वाजता सुदर्शन घुले हा पुन्हा आवादाच्या कार्यालयात गेला व कराड यांना भेटा व त्यांची मागणी पूर्ण करा असा मेसेज सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना दिला. त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनील शिंदे यांच्याकडे आहे.
२९ तारखेला दुपारी सव्वा दोन वाजता वाल्मीक कराड व इतर सर्व आरोपी विष्णू चाटेच्या केज येथील पक्षाच्या कार्यालयात भेटले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज, टॉवर लोकेशन, पुरावे आहेत.
६ डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले सुधीर सांगळे, हे साडेबारा वाजता आवादा कंपनीच्या मसाजोग येथील ऑफिसमध्ये आले. सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली मारहाण केली. त्यावेळी शिवाजी थोपटे बाहेर आले. यावेळी सुदर्शन घुले यांनी सांगितले दोन कोटीची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा. यासंदर्भात माहिती सरपंच संतोष देशमुख यांना कोणीतरी दिली. हा वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख व गावातील काही लोक आले. यावेळी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर याची पोलिसांना माहिती दिली. दुपारी दीड वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घुले व इतर आरोपींना ताब्यात घेऊन गेले. पण या सर्व आरोपींना प्रत्यक्ष अटक ७ डिसेंबर रोजी पहाटे दाखवण्यात आली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतली नाही, असे निकम यांनी न्यायालयाला सांगितले.
७ डिसेंबर २०२४ च्या रात्री आठ वाजता वाल्मीक कराडला घुलेने फोन केला. फोनवर घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. यावेळी कराडने अडथळा आणतील त्यांना संपवा असे सांगितले, अशी कबुली घुले याने दिली आहे. (त्याचे पुरावे आहेत)
अशी झाली हत्या
८ डिसेंबर रोजी विष्णू चाटे, सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजरसुंबा रोडवर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेल वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्रित भेटले. त्यांची बैठक झाली. यावेळी विष्णू चाटे संतापला होता. यावेळी घुले यांनी चाटेला सांगितले मी त्या ठिकाणी गेलो होतो. पण संतोष देशमुख आडवे आले. यावेळी विष्णू चाटे याने वाल्मीक कराडचा मेसेज सुदर्शन घुले याला दिला. आडवे आले तर कायमचा धडा शिकवा.
त्यानंतर ९ डिसेंबर २०२४ दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख यांची बीड रोडवर उमरी फाटा टोल नाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. किती क्रूर पद्धतीने मारले याचे फोटो आणि व्हिडिओ यातून दिसत आहे. आरोपी यावेळी हसून आनंद घेत होते. आमचे काही होऊ शकत नाही. आमच्यावर यापूर्वीही केसेस आहेत असे त्यांना वाटत होते. चार्ज फ्रेमसाठी ही केस तयार आहे. असा तब्बल ३२ मिनिटे युक्तिवाद उज्वल निकम यांनी केला.