प. बंगाल: भाजपा बूथ अध्यक्ष विजय भुईया हत्येप्रकरणी एनआयएकडून छापेमारी

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून हत्या केल्याचा आरोप

प. बंगाल: भाजपा बूथ अध्यक्ष विजय भुईया हत्येप्रकरणी एनआयएकडून छापेमारी

पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूरमधील मोयना येथील भाजपा नेते आणि बूथ अध्यक्ष विजय कृष्ण भुईया यांचे साधारण वर्षभरापूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता नवे अपडेट समोर आले आहेत. भाजपाचे बूथ अध्यक्ष विजय कृष्ण भुईया यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने विविध ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था ‘एएनआय’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.

भाजपा नेते आणि बूथ अध्यक्ष विजय कृष्ण भुईया यांच्या हत्येप्रकरणी सोमवार, ९ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा ठिकठिकाणी एनआयएने शोधमोहीम राबवली होती. पहाटे २ च्या सुमारास एनआयएचे अधिकारी मोयना येथे पोहोचले आणि त्यांनी गोरमहल आणि मोयना, पूर्व मेदिनीपूरच्या लगतच्या भागात विविध ठिकाणी शोध घेतला. भुईया यांची मे २०२३ मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल केली होती. शिवाय एनआयए चौकशीची मागणी करत कुटुंबाने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हे ही वाचा:

गणपती मंडपावर दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा ‘प्रसाद’

४,२०० कोटी रुपये कोटी द्या नाहीतर… अदानी समुहाचा बांगलादेशला इशारा

दिल्लीत १ जानेवारीपर्यंत फटाके विक्री आणि खरेदीवर ‘पूर्ण बंदी’

वंदे भारत ट्रेनवर झालेल्या दगडफेकीमुळे लाखोंचे नुकसान !

विजय कृष्ण भुईया यांना २०२३ च्या मे महिन्यात त्यांच्या पत्नीसमोर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर काही लोकांनी त्यांचे अपहरण केले. नंतर त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह घराजवळ फेकून दिला. ज्या लोकांनी ही हत्या केली ते सत्ताधारी पक्ष तृणमूलशी संबंधित असल्याचे त्यांच्या पत्नीने स्पष्टपणे सांगितले होते. तसेच ते भाजपा पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवाय या प्रकरणानंतर पोलिसांनीही गुन्हा नोंदवण्यास विलंब केल्याचा आरोप करण्यात येत होता.

Exit mobile version