अभिनेता विवेक ऑबेरॉयची केली दीड कोटींची फसवणूक; एकाला अटक

आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी

अभिनेता विवेक ऑबेरॉयची केली दीड कोटींची फसवणूक; एकाला अटक

नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित चित्रपट ‘हड्डी’चा निर्माता संजय साहा याला अभिनेता विवेक ओबेरॉय आणि त्याच्या कंपनीला सन २०२२ ते २०२३ दरम्यान एक कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अंधेरीतून साहा याला फसवणूक, बनावटगिरी, विश्वासघात आणि निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

 

 

पोलिसांनी साहाला स्थानिक न्यायालयात हजर केले असता, त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस आता त्याची पत्नी राधिका नंदा आणि आई नंदिता साहा यांचा शोध घेत आहेत. ‘आरोपींनी एका कार्यक्रमात पैसे गुंतवायला लावले आणि आकर्षक नफ्याचे आश्वासन दिले. मात्र, नंतर आरोपींनी या रकमेचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला,’ असा आरोप अभिनेता विवेक ऑबेरॉय याने केला आहे.

 

हे ही वाचा:

मुंबई पोलीस दलात ‘मिशन कर्मयोगी’ उपक्रम राबविण्यात येणार

रासायनिक बॉम्बस्फोट घडवून २६/११ पेक्षा मोठ्या हल्ल्याचा होता कट

ट्रॅकवर दगड, लोखंडी रॉड ठेवून वंदे भारतला अपघात घडविण्याचा कट!

३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भारताच्या पारुलला रौप्य तर प्रीतीला कांस्य पदक

ओबेरॉयचे व्यवस्थापक देवेन बाफना यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. सन २०१७मध्ये ओबेरॉय आणि त्यांची पत्नी प्रियंका यांनी एलएलपी कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादने विकली जात. लवकरच, ओबेरॉयची साहाशी ओळख झाली. त्याने तो चित्रपट उद्योगाचाच भाग असल्याचा दावा करून ओबेरॉयला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये गुंतवणूक करण्यास राजी केले.

 

 

ओबेरॉय आणि साहा यांनी मिळून ‘आनंदिता एंटरटेनमेंट’ची स्थापना केली. ज्यामध्ये साहाची पत्नी राधिका नंदा आणि त्यांची आई नंदिता साहा भागीदार बनल्या. पोलिसांनी सांगितले की, सन २०२१मध्ये, फर्मने नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपट ‘हड्डी’च्या मार्केटिंगची जबाबदारी घेतली. ओबेरॉय त्याच्या कामात व्यग्र असल्याने, फर्मचे दैनंदिन व्यवहार साहा आणि त्याची पत्नी राधिका पाहत होते.

 

ओबेरॉय यांना नंतर कळले की, आनंदिता एंटरटेनमेंटने कोणतेही वैध कारण न सांगता मोठी रक्कम हस्तांतरित केली होती. सन २०२२मध्ये, जेव्हा आनंदिता एंटरटेनमेंटचा कर्मचारी ओबेरॉयला भेटला तेव्हा त्याने साहा हा निधीचा गैरवापर करत असल्याची माहिती दिली. साहाने त्याच्या वैयक्तिक खर्चासाठी पाच लाख रुपये, राधिकाच्या पगारासाठी १० लाख रुपये आणि दागिने खरेदी करणे यासाठी मोठ्या रकमा हस्तांतरित केल्याचे समजले. आनंदिता एंटरटेनमेंटने अशाप्रकारे एकूण ५८ लाख रुपये उकळले. आरोपींनी नवाजुद्दीन सिद्दीकीचीही फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

‘साहा आणि राधिकाने ओबेरॉयची एक कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केली. आम्ही आता आणखी दोन आरोपींचा शोध घेत आहोत. ओशिवरा आणि सायबर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या फसवणुकीच्या प्रकरणात साहाला आधीच अटक केली आहे,’ असे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. साहाने इतर अनेकांना फसवले असल्याने हे हिमनगाचे केवळ टोक आहे, असा दावा ओबेरॉयचे वकील अमर ठाकूर आणि प्रेरक चौधरी यांनी केला.

Exit mobile version