म्हणून विराटची ऑडी आहे पोलिसांच्या ताब्यात

म्हणून विराटची ऑडी आहे पोलिसांच्या ताब्यात

फार पूर्वी विराटच्या मालकीची असणारी आलिशान गाडी सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. २०१६ मध्ये विराटने सागर उर्फ शैगी ठक्कर याला ही आलिशान गाडी विकली होती. मात्र ही गाडी शैगीच्या नावावर होण्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला. तेव्हा २०१६ मध्ये ही गाडी ठाणे पोलिसांनी जप्त केली असून तेव्हापासून ही आलिशान गाडी पोलीस ठाण्याच्या आवारात धूळ खात उभी आहे.

ठाणे गुन्हे शाखेने ऑक्टोबर २०१६ मध्ये मीरारोड येथील एका इमारतीतील कॉल सेंटरवर धाड टाकली होती. या कॉल सेंटरमधून अमेरिका आणि इतर काही देशातील नागरिकांना टॅक्स चुकवल्याचा धाक दाखवून दंड भरण्याच्या नावाखाली हजारो डॉलर्सला फसवले जात होते. या कॉल सेंटरचा प्रमुख सूत्रधार शैगी होता. पूर्वी त्याने अमेरिकेतील टेलिफोन कंपनीमध्ये काम केले होते आणि तिथून परतल्यानंतर नोयडामधील कॉल सेंटरमध्ये काम केले होते. पुढारीने हे वृत्त दिले आहे.

२०१५ मध्ये त्याने मीरा रोड येथे कॉल सेंटर सुरू केले आणि तिथून तो विविध कंपन्यांच्या नावाने व्यवहार करत असे. या कॉल सेंटरमधून एका दिवसाला तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांची उलाढाल होत असे. या कामात त्याची बहिण रिमा ठक्कर हिने त्याची मदत केली होती. कॉल सेंटरवर धाड पडताच शैगी विदेशात पळून गेला होता.

हे ही वाचा:

एसटीचे कर्मचारीही थकले आणि त्यांचे वेतनही

…आणि डॉक्टरच्या खात्यातून गायब झाले पैसे

पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक

महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

शैगीची गर्लफ्रेंड दिल्लीत राहत होती आणि ती विराटची चाहती होती. आपल्या गर्लफ्रेंडला विराटशी भेट घालून देण्यासाठी  शैगीने गुरग्रामच्या  गावच्या एका क्लबमध्ये जंगी पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत विराट ही गाडी घेऊन आला होता. विराटची ही आलिशान ऑडी गाडी तिला आवडली आणि तिलाही तशीच गाडी हवी असल्याची मागणी तिने शैगीकडे केली. त्यानंतर ७ मे २०१६ रोजी शैगीने एका एजंटच्या मध्यस्तीने ही गाडी विराटकडून खरेदी केली आणि मैत्रिणीला भेट दिली. परंतु गाडी शैगीच्या नावावर होण्याआधीच पोलिसांनी त्याच्या काळ्या धंद्याची पोलखोल केली आणि ही गाडी विराटच्या नावावरच राहिली.

कॉल सेंटर प्रकरणाची तपासणी करत असताना अडीच कोटी रुपये किंमतीची गाडी शैगीच्या हरियाणा मधील रोहतक येथील घराच्या समोरून मिळाली आणि पोलिसांनी ही गाडी जप्त करून पोलीस ठाण्यात आणली. गाडीच्या तपासादरम्यान ही गाडी विराट कोहलीच्या नावे असल्याचे उघड झाले. केनिया विरुद्धच्या सामन्यात विजयाचा जल्लोष करताना विराटने हीच गाडी मैदानातून फिरवली होती.

Exit mobile version