मणिपूरमध्ये सुरू असलेली हिंसा थांबण्याचं नाव घेत नसून सुरू असलेल्या आंदोलनाला अति हिंसक वळण मिळत आहे. या हिंसक आंदोलकांनी थेट मंत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री आर के रंजन सिंह यांच्या घराला आंदोलकांनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
केंद्रीय मंत्री आर के रंजन सिंह यांच्या इंफाळ येथील घरावर आंदोलकांनी पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांचं घर जाळलं. मात्र, सिंह हे तेव्हा घरी नव्हते, त्यामुळे ते थोडक्यात बचावले. पेट्रोल बॉम्ब फेकताच आगीने पेट घेतला आणि घरभर आग पसरली. घराला आग लागताच घरातील लोक तात्काळ बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे. विशेष म्हणजे इंफाळमध्ये संचारबंदी लागू असतानाही जमावाने संचारबंदी झुगारून केंद्रीय मंत्र्याच्या घरावर धडक देत घर पेटवून दिलं. घरावाजवळ सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मंत्री सिंह हे सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या हल्ल्यातून ते बचावले आहेत. ‘माझ्या राज्यात जे काही होतंय ते पाहून मला दु:ख झालं आहे. सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन आहे. मी एका कामानिमित्ताने केरळला आलेलो आहे. काल रात्री इंफाळ येथील माझं घर पेटवून दिलंय. सुदैवाने त्यात कोणताही जीवित हानी झाली नाही. हिंसक लोक पेट्रोल बॉम्ब घेऊन आले होते. त्यांनी घरावर पेट्रोल बॉम्ब टाकले. त्यामुळे लागलेल्या आगीत माझ्या घराच्या तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर मोठं नुकसान झालं आहे,’ अशी माहिती सिंह यांनी दिली.
It is very sad to see what is happening in my home state. I will still continue to appeal for peace. Those indulging in this kind of violence are absolutely inhuman: Mos MEA Rajkumar Ranjan Singh to ANI
— ANI (@ANI) June 16, 2023
हे ही वाचा:
कर्नाटकमधील पाठ्यपुस्तकांमध्ये आंबेडकर, नेहरू परतले
गुजरातला ‘बिपरजॉय’चा तडाखा! वादळाने घेतला पिता-पुत्रांचा प्राण
आंदोलक कुस्तीपटूंविरोधात दिल्ली पोलिस गुन्हे मागे घेणार
मकोका लागलेल्या गँगस्टरशी राऊत बंधूंची सलगी कशी?
मैतेई आणि कुकी समुदायात गेल्या दोन महिन्यांपासून तणाव सुरू आहे. मणिपूरमध्ये कुकी आदिवासी गटाने काढलेल्या निषेध मोर्चामुळे अशांतता उफाळून आली. मणिपूर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या आदेशात राज्य सरकारला मैतेई समुदायाचा अनुसूचित जमाती (एसटी) यादीत समावेश करण्याच्या मागणीबाबत केंद्राकडे शिफारस पाठविण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मणिपूरला गेले होते. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात येईल अशी शक्यता होती. मात्र, काही काळ लोटताचं आंदोलनाने पुन्हा हिंसक वळण घेतलं आहे.