काल झालेल्या रामनवमीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी शोभायात्रा निघतात. मात्र मध्य प्रदेशमध्ये श्रीराम जयंतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेमध्ये हिंसाचाराचा प्रकार घडला आहे. खरगोनमध्ये श्रीराम जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर एका विशिष्ट भागातील लोकांनी अचानक घराच्या छतावरून दगडफेक करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी तीसहून अधिक दुकाने आणि घरांना आग लावली होती.
अनेक तास हा हिंसाचार चालला होता. एका विशिष्ट गटातील लोकांनी अचानक हा हल्ला केला होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हे प्रकरण थोडे शांत झाले, मात्र रात्री १२ वाजता पुन्हा हिंसाचार उसळला. आनंद नगर, संजय नगर, मोतीपुरा येथे घरे जाळण्यात आली तर काही घरेही लुटली. या घटनेत १० पोलीस कर्मचारी आणि २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. एसपी सिद्धार्थ चौधरी यांच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. एकूण ८४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
खरगोनमध्ये एकूण २५ ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत, तर एकूण २७ लोक जखमी झाले आहेत. खरगोनमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या गोंधळानंतर खरगोनमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. खरगोन शहरात लागू करण्यात आलेला संचारबंदी ३ दिवस कायम राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे.
हे ही वाचा:
गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत २ दिवसांची वाढ
५८ कोटी कुठले, एवढेच पैसे दिले सोमय्यांनी
शाहबाज शरीफ झाले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान
‘कायद्याच्या धाकाने नाही तर सर्वांशी प्रेमाने वागल्यानेच पोलिसांची प्रतिमा उंचावेल’
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जखमी झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी सांगितले आहे. तर कोणत्याही दंगलखोराला सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. ज्यांनी दगडफेक केली, मालमत्तेचे नुकसान केले त्यांच्याकडून आम्ही सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान देखील वसूल करू, असे शिवराज सिंह म्हणाले आहेत.