देशभरात ईद साजरी केली जात असताना राजस्थानमधील जोधपूरमध्ये दोन गटांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. ईद आणि अक्षय्यतृतीयेच्या पूर्व संध्येला म्हणजेच सोमवार, २ मे रोजी हा राडा झाला. यावेळी रात्री दोन समुदाय आमनेसामने आले आणि झेंडा लावण्यावरून त्यांच्यात तुफान राडा झाला.
जालोरी गेटजवळ स्वातंत्र्य सैनिक बाल मुकुंद बिस्सा यांच्या मूर्तीवर झेंडा लावण्यावरून वाद झाला. या मूर्तीवर असणारा भगवा झेंडा काढून हिरवा झेंडा लावल्याने हा वाद उफाळून आला होता. त्यानंतर या वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अखेर जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केल्यानंतर पोलिसांनी या जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.
जोधपूर येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तात्पुरती इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयातून आदेश देण्यात आले आहेत. या हिंसाचारात अनेक गाड्यांचे नुकसान झाले. सध्या या संवेदनशील परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
‘अॅमेझॉन’वर गुन्हा; औषधांची प्रिस्क्रिप्शनविना विक्री
राणा दांपत्याच्या घरात पालिकेला दिसले ‘अनधिकृत’
लोकमान्य टिळकांवरच्या आक्षेपांना टिळकांच्या वंशजांचे सडेतोड उत्तर
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केले की, “जोधपूरच्या जालोरी गेट येथे दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षामुळे तणाव निर्माण होणे दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जोधपूर, मारवाडच्या प्रेम आणि बंधुभावाच्या परंपरेचा आदर करत मी सर्व पक्षांना शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो.