गेल्या तीन महिन्यांपासून ईशान्येकडील मणिपूर राज्यात हिंसाचार बळावला आहे. आतापर्यंत राज्यात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. हिंसाचाराच्या घटना सुरूच असून बिष्णुपूर जिल्ह्यात झालेल्या संघर्षात २१ जण जखमी झाले आहेत.
मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील कांगवाई आणि फौगाक्चाओ भागांत झालेल्या संघर्षांत एकूण २१ जण जखमी झाले आहेत. यात पत्रकाराचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. लष्कर आणि जलद कृती दलाच्या (आरएएफ) जवानांनी या वेळी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या. इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिमच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी यापूर्वी संचारबंदीत दिलेली सूट मागे घेतली, तसेच संपूर्ण इम्फाळ खोऱ्यात रात्रीच्या संचारबंदीव्यतिरिक्त दिवसाही निर्बंध लागू केले.
या संघर्षांच्या काही तास आधी, मणिपूरच्या संघर्षांत मारल्या गेलेल्या कुकी- झोमी लोकांचा नियोजित सामूहिक दफनविधी थांबवण्यात आला. चुडाचांदपूर जिल्ह्यातील प्रस्तावित दफनस्थळी ‘जैसे थे’ स्थितीत राखण्याचा आदेश राज्याच्या उच्च न्यायालयाने गुरुवारी सकाळी दिला. त्यानंतर सुरक्षा दलांच्या हालचाली रोखण्यासाठी हजारो स्थानिक लोक रस्त्यांवर आल्यामुळे बिष्णुपूर जिल्ह्यात सकाळपासून तणाव वाढत होता. तुइबुओंग येथील दफनस्थळी जाण्याची मुभा द्यावी अशी मागणी करत स्थानिकांनी अडथळे ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला कठोर पाऊल उचलावे लागले.
हे ही वाचा:
ठाण्यात एनसीसीच्या कॅडेट्सना अमानुष मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल
केजरीवाल यांच्या बंगल्याचे सत्य लपविण्यासाठीच सेवा विधेयकाला विरोध
अमित शहा लोकसभेत पंडित नेहरूंबद्दल बोलले…विरोधक झाले निरुत्तर!
पुणे दहशतवादी प्रकरणातील पाचवा आरोपी देत होता बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण
मणिपूरमधील हिंसाचार थांबायचे नाव घेत नसून आतापर्यंत या हिंसाचारात सुमारे १६० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. मणिपूरमधील हिंसाचाराचा परिणाम आता राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मणिपूर राज्याचे जीएसटी संकलन घटले आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या जुलै २०२३ च्या जीएसटी संकलनाच्या आकडेवारीनुसार, मणिपूर या एकमेव राज्याचे जीएसटी संकलन घटले आहे.