सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे रविवार, १० सप्टेंबर रोजी सोशल मीडिया वरील आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. या घटनेनंतर साताऱ्यात सध्या इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे.
रविवारी दोन समुदायांमध्ये तणाव वाढला होता. याला हिंसक वळण मिळाले असून हल्लेखोरांनी जाळपोळ आणि दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इंटरनेट सेवाही बंद केली आहे. काही समाजकंटकांनी धार्मिक स्थळावर दगडफेक केल्याने या घटनेला हिंसक वळण लागल्याचे सांगण्यात येत आहे.
माहितीनुसार, १५ ऑगस्टपासून सातत्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे खटाव तालुक्यात तणावाचे वातावरण होते. याठिकाणी महापुरुषांवरही वादग्रस्त विधाने करण्यात आल्याने हे प्रकरण अधिकच तापले आहे. दरम्यान, दोन समुदायांमधील वाढत्या तणावादरम्यान एका मंदिरावर दगडफेक करण्यात आली. यानंतर हल्लेखोरांनी अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केली. पोलिसांनी मध्यस्ती केली.
दरम्यान, सातारा पोलीस अधीक्षकांनी निवेदनात म्हटलं आहे की, “१० सप्टेंबर २०२३ रोजी पुसेसावळी येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टवरुन लोकांचा गैरसमज होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला होता. तात्काळ सातारा पोलिसांनी प्रतिसाद देऊन या ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणली आहे. सध्या पुसेसावळी आणि परिसरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिलेला नाही. या ठिकाणी शांतता आहे. तसेच आवश्यक त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.”
हे ही वाचा:
भारतातील जी- २० मध्ये विक्रमी कामगिरी; ११२ प्रस्ताव संमत
‘भारताने जी २० अजेंड्यांचे युक्रेनिकरण होऊ दिले नाही’
जोकोव्हिचची विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅमला गवसणी
“या घटनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारीत करु नयेत. जेणेकरुन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क व दक्ष राहून काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा,” असं आवाहन सातारा पोलिसांनी केलं.