मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्हयात सोमवारी सकाळी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा तळोजा तुरुंगातून ताब्यात घेतले आहे.
सचिन वाझे याला मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या कार्यलायत वाझेच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयाकडून वाझेच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
गुन्हे शाखा कक्ष ११ कडे गोरेगाव येथील हॉटेल व्यवसायिकाकडे खंडणीचा तपास देण्यात आलेला असून या गुन्हयात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग,सचिन वाझेसह काही अधिकारी आणि खाजगी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेकडून परमबीर सिंग यांच्या वाळकेश्वर येथील घरी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र परमबीर सिंह त्या ठिकाणी नसल्यामुळे दाराला समन्स चिटकवण्यात आले होते.
हे ही वाचा:
जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी
गोवत्सद्वादशी… दिवाळीचा पहिला दिवस!
नवाब मलिकांनी लवंगी लावला, मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन
दरम्यान, गुन्हे शाखेने एनआयए च्या विशेष न्यायालयात अर्ज करून खंडणीच्या गुन्हयात वाझेचा ताबा मागितला होता.
विशेष न्यायालयाने गुन्हे शाखेला वाझेचा ताबा घेण्याची परवानगी दिल्यानंतर गुन्हे शाखेने सोमवारी तळोजा तुरुंगातून वाझेचा ताबा घेतला आहे. थोड्याच वेळात वाझेला किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सचिन वाझे हा मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया स्फोटक प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणात १० आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.