मुंबईतील धारावीमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. धारावीमध्ये एका मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धारावीमध्ये शनिवार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी मुंबई महानगरपालिकेचे पथक एका मशिदीच्या अनधिकृत भागावर कारवाई करण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, याची माहिती मिळताच कारवाईसाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला स्थानिकांनी रोखलं. तसेच पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्या ची माहिती समोर आली आहे. याठिकाणी शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तणावाची परिस्थिती पाहून पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, लोकांच्या विरोधामुळे पालिकेच्या पथकाने सध्या कारवाई थांबवली आहे.
हे ही वाचा :
वडोदराजवळ रेल्वे उलटवण्याचा प्रयत्न; ट्रॅकच्या फिश प्लेट ठेवल्या पेरून
इस्रायलने हिजबुल्लाच्या कमांडरला अचूक टिपले
एफएटीएफने दहशतवाद विरोधी भारताच्या प्रयत्नांचे केले कौतुक, गंभीर धोक्याचा इशाराही दिला!
अरेच्चा! बघता बघता ट्रकला रस्त्याने गिळले
माहितीनुसार, धारावीच्या परिसरात मेहबुब ए सुभानिया ही मशिद असून या मशिदीचा काही भाग अवैध असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शनिवारी मुंबई महानगरपालिकेचे पथक हे अनधिकृत भाग तोडण्यासाठी धारावीत दाखल झाले होते. मात्र, स्थानिकांनी त्यांना अडवले आणि पथकाच्या गाडीच्या काचाही फोडल्या. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. लोकांनी कायदा व सुव्यवस्था राखून दगडफेक करू नये, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या एका भागातील वाहतूक सुरळीत केली. मशिदीजवळ लोक रस्त्यावर बसले आहेत तर, आंदोलक मशीद पाडू नयेत, अशी मागणी करत आहेत.