बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मंगळवारी मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लावण्यात आला. यानंतर त्याला बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. अखेर बीड न्यायालयाने वाल्मिक कराड याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मकोका लावण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला बुधवारी बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. एसआयटी आणि सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. यावेळी एसआयटीने वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी दहा मुद्दे मांडले होते. तर, वाल्मिक कराडच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळत कराडची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला सात दिवसांची म्हणजेच २२ जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा मुक्काम आता एसआयटीच्या कोठडीत असणार आहे.
हे ही वाचा :
महाकुंभाची पाकिस्तानसह मुस्लीम देशांना भूरळ, गुगलवर सर्च करण्यात राहिले अव्वल!
आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा…मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिला कानमंत्र!
महाकुंभात ५ विद्या कुंभांची स्थापना
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रार्पण केलेल्या INS सुरत, INS नीलगिरी आणि INS वाघशीरमध्ये काय आहे विशेष?
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या दिवशी (९ डिसेंबर) झाली, त्यादिवशी दुपारी ३.२० ते ३.३० दरम्यान दहा मिनिटांमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले होते. या तिघांमध्ये नेमकं काय बोलणं झाला याचा तपास एसआयटीला करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या दहा दिवसाच्या कस्टडीची मागणी करण्यात आली होती. तसेच वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा दावाही एसआयटीकडून करण्यात आला आहे. तसेच फरार आरोपी कृष्णा आंधळे याला लपवण्यात यांचा हात आहे का? याची माहितीही एसआयटीला घ्यायची आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे गेले अनेक दिवस फरार होते. त्यांना कोणी मदत केली? याचा तपास एसआयटी करायचा असून या प्रकरणाच्या सखोल चौकशी संदर्भात बीड न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.