कांदिवलीतील बोगस लसीकरणप्रकरणी फरार असणाऱ्या सुत्रधारापैकी एकाला बारामती येथून अटक करण्यात आली असून आरोपीची संख्या १३ झाली आहे. दरम्यान समता नगर, आंबोली आणि अंधेरी एमआयडीसी येथे गुरुवारी तीन गुन्हे दाखल झाले असून बोगस लसीकरण प्रकरणी एकूण ११गुन्हे दाखल झाले आहेत.
राहुल दुबे आणि राजेश पांडे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. राजेश पांडे हा सुत्रधारापैकी एक असून त्याला बारामती येथून अटक करण्यात आली आहे. तर राहूल हा शिवम रुग्णालयातील कर्माचारी असून त्याला कांदिवलीतून अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
व्हीप बजावल्यानंतरही आमदारांना थेट फोन करण्याची वेळ का आली?
जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात सुनावणी ६ जुलैला
कांदिवलीतील बोेगस लसीकरण प्रकरण उघडकीस येताच कांदिवली पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता, गुन्हा दाखल होताच आतापर्यंत दहाजणांना पोलिसांनी अटक केली होती, त्यात डॉ. मनिष त्रिपाठी, महेंद्र प्रताप सिंग, संजय विजय गुप्ता, चंदन रामसागर सिंह, नितीन वसंत मोडे, मोहम्मद करीम अकबर अली, गुडिया रामबली यादव, शिवराज छोटूलाल पटारिया आणि निता शिवराज पटारिया यांचा समावेश होता.
या आरोपींच्या चौकशीत राजेश पांडे यांचे नाव समोर आले होते, त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता, ही शोधमोहीम सुरु असतानाच राजेश हा बारामती येथे लपला असल्याची कांदिवली पोलिसांना मिळाली होती, या माहितीनंतर या पथकाने बारामती येथील एका लॉजमध्ये वास्तव्यास असलेल्या राजेश पांडेला शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले, त्याच्या अटकेनंतर राहुल दुबेला पोलिसांनी अटक केली.
पोलीस तपासात या दोघांनी आतापर्यंत दहा ठिकाणी लसीकरण कॅम्पचे आयोजन केले होते, राहुल हा शिवम रुग्णालयात तर राजेश हा अंधेरीतील एका नामांकित रुग्णालयात कामावर होते. शिवम रुग्णालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण कॅम्पमध्ये आतापर्यंत १७ हजार १०० जणांना लस देण्यात आली होती, त्यापैकी २१६ जणांना नंतर त्रास झाला होता, कोव्हीशिल्डच्या नावाने ही टोळी ग्लुकोजचे पाणी लस म्हणून देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. भेसळयुक्त द्रव्य देऊन त्यांनी अनेकांच्या जिवाशी खेळ केला होता. त्यामुळे या दोघांच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान या टोळीविरुद्ध आतापर्यंत बोरिवली पोलीस ठाण्यात दोन, कांदिवली, खार, वर्सोवा, बांगुरनगर, भोईवाडा, आंबोली, समतानगर , एमआयडीसी आणि ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.