माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नातीने पती आणि सासरच्या मंडळींवर मारहाण, शिविगाळ आणि हल्ला केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. राजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातीने या तक्रारीत सासरच्या मंडळींनी हुंडा मागितल्याचाही आरोप केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांची नात अंद्रिजा मंजरी सिंह यांचा विवाह सन २०१७मध्ये ओडिशाचे माजी मुख्यमंत्री यांचा नातू अर्केश सिंह यांच्याशी झाला होता. ओडिशा विधानसभा निवडणुकीनंतर अंद्रिजा आणि त्यांचे पती डेहराडून येथे राहात होते. १३ मे रोजी अंद्रिजा या काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. घरी परतल्यानंतर त्यांनी पाहिले की त्यांचे पती अर्केश आणि त्यांचे मॅनेजर हरि सिंह आधीपासूनच उभे होते. त्या घरी घुसण्याचा प्रयत्न करत असताना दोघांनी कुलूप लावले. याचे कारण विचारले असता, ते तिला मारहाण करू लागले. तसेच, शिविगाळ आणि ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार अंद्रिजा यांनी दाखल केली आहे.
हे ही वाचा:
कर्नाटकमध्ये ‘मोफत’ योजनांमुळे वाढणार ५० हजार कोटींचा भार
‘युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी भारत शक्य ते सर्व करेल’
…आणि बायडेन मोदींना म्हणाले, मला तुमची स्वाक्षरी घ्यायला हवी!
मान्सून आला!! अंदमानात तीन दिवस आधीच दाखल झाल्याने उत्साह !
या प्रकरणी राजपूर ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांनी त्यांचे सासरे, माजी खासदार अनंग उदय सिंह, दीर अलिकेश नारायण यांच्यावर छळाचा आरोप केला आहे. तसेच, सासरची मंडळी हुंड्याची मागणी करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हे प्रकरण पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहोचले होते. काही दिवसांपूर्वी अंद्रिजाने पोलिस मुख्यालयातही तक्रार केली होती. या संदर्भात निष्पक्ष कारवाई होत असून पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.