महिलांची गर्भाशयं काढण्याच्या प्रकरणांत गेल्या काही वर्षांत वाढ झालेली दिसते. गेल्या १५ महिन्यांमध्ये जवळपास ६५१ गर्भपिशव्या काढल्याचे आता समोर आलेले आहे.
बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजूर महिला आजाराला कंटाळून गर्भाशय काढतात, वैद्यकीय नीतिनियमांना धाब्यावर बसवून मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात अनेक तरुण महिलांची गर्भाशयं काढून टाकण्यात येत आहेत. गर्भाशय काढणे हा आता बीड जिल्ह्यात तर धंदाच झालेला आहे.
बीड जिल्हयातील गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण दिवसागिणक अधिक वाढलेले आहे. या एकूणच सर्व गोष्टींचे आरोग्यावर फारच दुष्परिणाम होत आहेत. हजारो महिला आरोग्याविषयीच्या समस्यांना तोंड देत आहेत तसेच याचे दुष्परीणाम भोगत आहेत.
गर्भाशय काढण्याच्या हिस्ट्रेक्टॉमीच्या बहुतांश शस्त्रक्रिया अनावश्यक असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटलंय. महिलांनी गर्भाशय काढल्याने अनेकींच्या आरोग्याची वाताहत झालेली आहे. शिवाय यामध्ये सरकारी इस्पितळांपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण फार मोठे आहे. एकूणच या प्रकरणावर लक्ष दिल्यास, सरकारदरबारी दुर्लक्ष होतेय हेच दिसून येत आहे.
हे ही वाचा:
कुर्ल्यात अडकले रेल्वे ट्रॅक…वाचा
…म्हणून राहुल गांधींचे ट्विटर खाते झाले लॉक!
जिल्ह्यातील गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण अद्यापही थांबलेले नाही. गरज नसतानाही काही महिलांना परवानगी घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविले जात असल्याचे दिसले. तपासणी केल्यानंतर गरज नसल्याचे सिद्ध झाले. याच अनुषंगाने माहिती घेतली असता मागील १५ महिन्यांत जिल्हाभरात तब्बल ६५१ महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली आहे.
खासगी रुग्णालयातील आणि सरकारी रुग्णालय यांच्यातील साटेलोटे असल्याचेही आता समोर येत आहे. कमी वय व औषधोपचार असे म्हणून सीएसकडून परवानगी नाकारली जाते. तिच परवानगी सरकारी रुग्णालयातून लगेच मिळते. त्यामुळेच गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे.