डीप फेक व्हिडीओ वापरून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुंबईतील एक महिला डॉक्टर डीप फेक व्हिडीओची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील अंधेरी येथे एका ५४ वर्षांच्या महिला आयुर्वेद डॉक्टरची सात लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
माहितीनुसार, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या डीप फेक व्हिडिओच्या सहाय्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवरील या व्हिडिओमध्ये ते ‘राजीव शर्मा ट्रेड ग्रुप’ संदर्भात बोलताना दिसत आहेत. या फेक व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी हे लोकांना अधिक परताव्यासाठी या कंपनीची बीसीएफ इंव्हेस्टमेंट ऍकेडमीमध्ये प्रवेश घेण्यास सांगत आहेत.
मुंबईच्या डॉक्टर के के एच पाटील यांच्यासोबत ही फसवणूक २८ मे ते १० जून रोजी दरम्यान झाली. या कालावधीत त्यांनी १६ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण सात लाख रुपये पाठवले. यानंतर त्यांना अधिक परतावा आणि अंबानींकडून प्रमोशनचे आमिष देण्यात आले. यानंतर आपली फसवणूक होत असल्याची बाब महिला डॉक्टरच्या लक्षात आली.
ट्रेडिंग वेबसाइटवर डॉ. पाटील यांना ३० लाख रुपयांचा नफा झाल्याचे दिसत होते. मात्र, त्यांना पैसे काढता येत नव्हते. यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचा संशय आला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या फसवणुकीसाठी चोरट्यांनी डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
भारत खेळणार बांग्लादेश, न्यूझीलंडविरोधात कसोटी मालिका
सुपर ८ ची विजयी सुरुवात; भारताचा अफगाणिस्तानवर विजय
दक्षिण मुंबईमधून दोन बांगलादेशी महिलांना अटक
‘डार्कनेटमधून फुटली होती यूजीसी-नेटची प्रश्नपत्रिका’
याप्रकरणी पोलिस बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. संबंधित महिलेने ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले होते ते खाते बंद करण्यात आले आहे. हा मुकेश अंबानी यांचा अशा प्रकारचा दुसरा डीप फेक व्हिडिओ आहे. यापूर्वी, मार्च महिन्यात त्यांचा असाच एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हडिओमोध्ये ते स्टॉक ट्रेडिंग मेंटरशिप प्रोग्रॅमसंदर्भात बोलताना दिसत होते. हा व्हडिओ एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आला होता.