उत्तर प्रदेशातील बहराइच येथील एका विवाहित मुस्लिम महिलेने अयोध्येच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्यामुळे तिच्या पतीने ‘तिहेरी तलाक’ दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पती, सासू आणि इतरांनी बेदम मारहाण केल्याचा आरोपही पिडीत मुस्लीम महिलेने केला आहे.
जरवाल रोड पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक (एसएचओ) ब्रिजराज प्रसाद यांनी सांगितले की, मोहल्ला सराय असे पीडित मुस्लीम महिलेचे नाव असून बहराइचमधील ठाणे जारवाल रोड येथील रहिवासी आहे. तिने आपल्या तक्रारीत म्हटले कि, १३ डिसेंबर २०२३ रोजी माझा विवाह अयोध्येतील कोतवाली नगर येथील मोहल्ला दिल्ली दरवाजा येथे राहणारे इस्लाम यांचा मुलगा अर्शद याच्याशी झाला. लग्नानंतर आम्ही फिरण्यासाठी शहरात दाखल झालो असता, तेथील अयोध्या धामचे रस्ते, सुशोभीकरण, विकास आणि तेथील वातावरण मला प्रचंड आवडले. यावर मी माझ्या पतीसमोर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले,” असे पिडीत महिलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार ती पुढे म्हणाली, या घटनेनंतर पतीने मला माझ्या आई-वडिलांच्या घरी पाठवले. काही दिवसानंतर काही लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर मी पुन्हा पतीच्या घरी आले. मात्र, माझ्यावर पती आणि त्याच्या कुटुंबियांकडून अत्याचार सुरु होता. पतीने रागाने माझ्यावर गरम असलेले जेवण पदार्थ फेकले, असा आरोप महिलेने केला. एसएचओच्या म्हणण्यानुसार, पतीने मुख्यमंत्री, पंतप्रधानांना शिवीगाळ केली आणि “तलाक, तलाक, तलाक” असे उच्चारून घटस्फोट दिला. घटस्फोटाच्या दिवशी पतीनेही मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे.
हे ही वाचा :
आसाम गँगरेप: मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला, तलावात उडी मारून मृत्यू
बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर मुंबई, ठाण्यातील शिक्षणाधिकारी निलंबित
नेपाळ बस अपघातात महाराष्ट्रातील २४ पर्यटकांचा मृत्यू; वायुसेनेच्या विमानाने मृतदेह राज्यात आणणार
दरम्यान, या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महिलेचा पती अर्शद, सासू रायशा, सासरा इस्लाम, मेहुणी कुलसुम, मेहुणा यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हल्ला, शिवीगाळ, धमकी आणि हुंडा प्रतिबंधक कायदा आणि मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.