उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाच्या मोठ्या कारवाईला यश आले आहे. उत्तर प्रदेश एटीएसने दोन आतंकवाद्यांची धरपकड केली असून हे आतंकवादी अल कायदा या आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. लखनऊ मधील काकोरी भागातून या दोघांना अटक करण्यात आली आहे.
काकोरी भागातील एका घरामध्ये अल कायदाशी संबंधित आतंकवादी लपले असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत एटीएसने कमांडो आणि फोर्स सोबत काकोरी भागात छापेमारी केली होती. ज्यामध्ये या दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पण या दोन दहशतवाद्यांना अटक केली असली तरीही या प्रकरणात एटीएस अधिकार्यांचा तपास अजूनही सुरू आहे.
हे ही वाचा:
‘उज्ज्वल’ भविष्यासाठी शिवसेना प्रयत्नशील?
ईडी करणार सचिन वाझेवर प्रश्नांचा मारा!
अफगाणिस्तानमध्ये धोका; भारतीय अधिकाऱ्यांना आणले माघारी
दहशतवाद्यांना मदत कराल तर याद राखा!
एटीएसच्या या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांकडून दोन प्रेशर कुकर बॉम्ब सापडले आहेत. तर अर्धवट तयार करण्यात आलेला एक टाईम बॉम्ब मिळाला आहे. तर इतरही काही हत्यारे एटीएसला मिळाल्याचे समजत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आतंकवाद्यांच्या समवेत अन्य काहीजण असल्याची माहिती मिळाल्यामुळे एटीएसचे शोधकार्य अजूनही सुरू आहे. येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये या आतंकवाद्यांकडून काहीतरी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांपैकी एकाचे नाव शाहिद असल्याचे समजत आहे. तो मूळचा मलिहाबादचा रहिवासी असल्याचे समजते. ज्या घरावर एटीएसने छापा टाकला ते घर शाहिदचेच असल्याची माहिती समोर येत आहे. तिथे तो त्याच्या कुटुंबाच्या समवेत राहत असून त्याचे स्वतःचे मोटार गॅरेज असल्याचे सांगितले जाते.