मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी उर्फ सतीश पै याला फिलिपाइन्समधून भारतात आणण्यात आले आहे. मंगळवारी रात्री भारतीय यंत्रणा सुरेश पुजारीला घेऊन दिल्लीत दाखल झाल्या. काही दिवसांपूर्वी पुजारीला यूएस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि डिपार्टमेंट ऑफ ज्युरीसडिक्शन यांच्या संयुक्त कारवाईत फिलिपाइन्समधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांना त्याला दिल्लीत आणण्यात यश आले आहे. सुरेश पुजारीवर मुंबईत २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सुरेश पुजारी हा गँगस्टर रवी पुजारी याचा भाऊ आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश व्यावसायिकांसह राजकारणी व लोकप्रतिनिधींना खंडणीसाठी गँगस्टर सुरेश पुजारी फोन करायचा. खंडणीच्या गुन्ह्यात मुंबई आणि त्याच्या लगतच्या भागात ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि डोंबिवली येथे वाँटेड असलेल्या पुजारीला मंगळवारी रात्री उशिरा फिलिपाइन्समधून अटक करून प्रत्यार्पण केल्यानंतर भारतात आणण्यात आले.
हे ही वाचा:
संतापजनक! MPSC ने केली मृत स्वप्निल लोणकरची क्रूर थट्टा
पुण्यात मनसेला धक्का! रुपाली पाटील यांचा राजीनामा
चीनच्या ‘आक्रमक कृती’विरुद्ध अमेरिकेचे महत्वाचे वक्तव्य
चार धाम महामार्गाच्या रुंदीकरणास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि सीबीआय अधिकाऱ्यांनी पुजारीला दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ताब्यात घेतले, असे वृत्त आहे. केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी केल्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. खंडणीच्या अनेक घटनांनंतर मुंबई आणि ठाणे पोलिसांनी २०१७ आणि २०१८ मध्ये त्याच्याविरुद्ध ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी केली होती. पुजारी हा १५ वर्षांहून अधिक काळ फरार होता आणि ऑक्टोबरमध्ये फिलिपाइन्समध्ये त्याला पकडण्यात आले होते.
काही वर्षांपूर्वी सुरेश पुजारी मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली आणि कर्नाटक या शहरांमध्ये खंडणीचे काम करत असे. याशिवाय तो लोकांना धमकीचे फोनही करत असे. फिलिपाइन्समध्ये त्याच्या अटकेनंतर अनेक व्यापारी, हॉटेलवाले, दारू विक्रेते आणि केबल ऑपरेटर्सनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
४८ वर्षीय पुजारी २००७ पासून भारताबाहेर आहे आणि मुंबई पोलिसांना २०२० मध्ये माहिती मिळाली होती की तो सध्या फिलिपाइन्समध्ये लपला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी आपल्या मैत्रिणीसोबत फिलीपाईन्सच्या एका हाय प्रोफाईल भागात राहत होता आणि तो क्वचितच घरातून बाहेर पडत असे.
सुरेश पुजारीचा ताबा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आला आहे. एटीएस कडून पुजारीवर असलेल्या राज्यभरातील गुन्ह्याचा तपास करण्यात येणार आहे. मुंबई गुन्हे शाखेला सुरेश पुजारीचा ताबा हवा होता मात्र तूर्तास त्यांना ताबा मिळू शकत नाही. एटीएसच्या तपासनंतर पुजारीला न्यायालयीन कोठडीत टाकण्यात आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखा पुजारीचा ताबा घेणार असल्याचे समजते. मुंबईत पुजारीवर असलेल्या गुन्ह्याची माहिती एकत्र करण्याचे काम सुरू आहे.