अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या करणारे ११ आरोपी हे तबलिगी जमातचे सदस्य असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ही माहिती दिली आहे. इरफान खान आणि मुशफिक अहमद या ‘सामाजिक चळवळ’ करणाऱ्यांनी या आरोपींना हे कृत्य करण्यास प्रवृत्त केल्याचेही उघड झाले आहे.
उमेश कोल्हे यांच्या हत्येत सहभागी असलेल्या या ११ आरोपींविरोधात एनआयएने आरोपपत्र दाखल केले. एनआयएने मुंबईच्या एनआयए न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. त्यात ज्या ११ जणांची नावे आहेत त्यात मुबाशीर अहमद, शाहरुख खान, अब्दुल तौसिफ शेख, मोहम्मद शोएब, आतिब रशिद, युसूफ खान, इरफान खान, अब्दुल अरबाझ, मुशफिक अहमद, शेख शकील, शाहीम अहमद यांचा समावेश आहे.
उमेश कोल्हे यांना मारण्याचा या आरोपींनी केलेला दुसरा प्रयत्न होता. उमेश कोल्हे यांनी केलेल्या पोस्ट युसूफ खान याने ब्लॅक फ्रीडम नावाच्या ग्रुपवर टाकल्या. युसूफ खानने उमेश कोल्हे यांचा फोन नंबर चोरून तो कलिम इब्राहिम नावाच्या ग्रुपवर टाकला. इरफान आणि इतरांनी मिळून तो ग्रुप तयार केला होता. एनआयएने म्हटले आहे की, कोल्हे यांना मारण्याची योजना तेव्हापासून तयार होऊ लागली.
हे ही वाचा:
साईबाबांच्या दर्शनासाठी १०९ कोटीचे ‘कॉम्प्लेक्स’
९७ कोटी रुपये भरा, राज्यपालांचे ‘आप’ला आदेश
कर्जमाफीचे आश्वासन पाळा म्हणत काँग्रेसच्या पदयात्रेत शेतकऱ्यांचे आंदोलन
१९ जूनला कोल्हे यांनी एक पोस्ट शेअर केल्यानंतर मोहम्मद शोएब, आतिब रशिद, इरफान, शाहिम अहमद हे अमरावती येथील गौसिया हॉलमध्ये जमले आणि त्यांनी कोल्हे यांना मारण्याची योजना आखली. इरफानने आपण यासाठी सर्वप्रकारची मदत कऱण्यास तयार आहोत असे सांगितले.
एनआयएच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, इरफानने त्या सगळ्यांना मोबाईल फोन सोबत आणायचे नाहीत असे बजावले. काळे टीशर्ट सगळ्यांनी घालायचे आणि ट्रॅक पॅन्ट घालायच्या, असेही सांगितले. शिवाय, आपापले चेहरे झाकण्याचाही सल्ला त्याने दिला. एकंदरीतच या सगळ्यांनी मिळून एक दहशतवादी गट तयार केला. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी या पोस्ट केल्या होत्या.
जेव्हा उमेश कोल्हे हे आपल्या मेडिकल दुकानातून बाहेर पडले तेव्हा २० जून रोजी त्यांना मारण्यात येणार होते पण तेव्हा कोल्हे सापडू न शकल्याने त्यांची योजना फसली. त्यानंतर इरफानने नवी योजना आखली. २० जूनच्या रात्री सर्वांनी पुन्हा एकदा बैठक घेतली. त्यानंतर शोएब आणि शाहिम यांच्याकडे कोल्हेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली. तो सापडल्यानंतर या दोघांनी त्याची बाईक थांबवली. शोएबने त्याच्यावर सुऱ्याने वार केला. त्यानंतर आरोपी पळून गेले आणि इरफानला भेटले. त्यानंतर खून केल्याचा आनंद त्यांनी साजरा केला. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार अब्दुल अरबाझने रुग्णालयात जाऊन कोल्हे मृत्युमुखी पडले आहेत, याची खात्री केली आणि ती माहिती इरफानला दिली. त्यानंतर इरफानने ती माहिती मौलवीला दिली. एनआयएने असेही म्हटले आहे की, श्रीगोपाल राठी, विशाल बहाद, जयकुमार अछाडा यांनाही अशाच धमक्या या कट्टर धर्मवाद्यांकडून आल्या होत्या.
एनआयने म्हटले आहे की, इरफान हा इस्टेट एजंट होता. तोच या हत्येतील खरा सूत्रधार आहे. इरफानने रेहबर नावाने एक एनजीओ स्थापन केली होती. गरिबांना अँब्युलन्स पुरविण्याचे काम तो या संस्थेच्या माध्यमातून करत असल्याचे समोर आले आहे. घरगुती समस्या सोडविण्याचेही काम तो करत असे.